आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा:लक्षात ठेवा, तुम्हालाही घरेदारे, मुले आहेत; मुख्यमंत्री ‘महाशय’ तर शिवसेना ‘विरोधी मित्र’

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उच्च न्यायालयात दिलासा, 17 सप्टेंबरपर्यंत कारवाई नाही, राज्य सरकारची हमी

मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभरात झालेला उद्रेक आणि ‘अटकनाट्य’ झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बुधवारी नरमाईचा सूर दिसून आला. पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘महाशय’ तर शिवसेनेचा उल्लेख ‘विरोधी मित्र’ असा केला. मात्र दिशा सालियान प्रकरणातील मंत्री आणि अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा इशाराही राणे यांनी दिला आहे. दरम्यान, नाशिक, महाड, पुणे येथे दाखल झालेल्या गुन्ह्यांप्रकरणात उच्च न्यायालयाने राणेंना दिलासा दिला अाहे. राणेंविरोधात पुढील सुनावणी म्हणजे १७ सप्टेंबरपर्यंत कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.

महाड येथे मंगळवारी जामीन मिळाल्यानंतर रात्री राणे मुंबईला परतले. त्यांची तळकोकणातील जनआशीर्वाद यात्रा दोन दिवस स्थगित करण्यात आली आहे. असून शुक्रवार, २७ ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. बुधवारी उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर दुपारी सांताक्रुझ येथील निवासस्थानी राणेंनी पत्रकार परिषद घेतली. “मी नसताना माझ्या घरासमोर येऊन आंदोलन करता. पण, तुम्हालाही मुलेबाळे आहेत, घरेदारे आहेत, इतकी आठवण ठेवा,’ असा गर्भित इशारा राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख न करता दिला.

मात्र पत्रकार परिषदेत त्यांचा सूर नरमाईचा होता. राणे म्हणाले, “मी जे काही बोललो ते देशाचा अवमान सहन न झाल्याने बोललो. राष्ट्राबद्दल अवमान दाखवला म्हणून बोललो. त्यात राग येण्यासारखे काही नव्हते. पण, खटला न्यायालयात आहे, त्यामुळे ते वाक्य मी परत उच्चारणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी ‘महाशय’ असा केला, तर शिवसेनेचा उल्लेख त्यांनी ‘विरोधी मित्र’ म्हणून केला.

राणेंना गुन्हे दाखल झाल्याठिकाणी हजर राहण्याची गरज नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महाड, पुणे, नाशिकसह विविध पोलिस ठाण्यांत नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल केले गेलेले आहेत. हे गुन्हे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राणेंच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यात उच्च न्यायालयाने राणे यांना दिलासा दिला. राणे यांच्या याचिकेवर १७ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. ‘तोपर्यंत राणेंना अटक करण्यात येणार नाही. त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही,’ अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात देण्यात आली.

राणेंच्या वतीने अॅड.अनिकेत निकम आणि अॅड.सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. सरकारी वकील अॅड. अमित देसाई यांनी राणे यांनी सुनावणीदरम्यान प्रक्षोभक वक्तव्य करु नये, अशी अट घालण्याची मागणी न्यायालयास केली होती. दरम्यान, राणे यांना अंतरिम दिलासा देताना न्यायालयाने कोणतीही अट घातलेली नाही. न्यायालयास आम्ही कोणतीही हमी दिलेली नाही, असे राणे यांचे वकील अॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.

राणेंचा वकिलांचा युक्तिवाद :
१. सुनावणीदरम्यान राणे यांनी प्रक्षोभक वक्तव्य करु नये, अशी अट घालू नये. माझ्या अशिलाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येईल.
२. माझ्या अशिलाने मुख्यमंत्र्यांबाबत केलेले वक्तव्य काल्पनिक (हायपोथेटिकल) होते. ज्यांना उद्देशून केले त्यांची तेथे उपस्थिती नव्हती.
३. राणे यांच्याविरोधातील गुन्ह्यांमध्ये गंभीर असे काही नाही. पोलिसांनी लावलेली कलमे चुकीची आहेत.
४. अनेक नेत्यांनी माझ्या अशिलापेक्षा प्रक्षोभक वक्तव्ये केलेली आहेत. मंत्री, आमदार फरारही झालेले होते. तरी राज्य सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नव्हती.

मुख्यमंत्र्यांविरुद्ध यवतमाळमध्ये तक्रार
यवतमाळ | सन २०२० च्या शिवसेनेच्या ऑनलाइन दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

अनिल परब यांना न्यायालयात खेचणार
शिवसेना वाढवण्यात माझा वाटा आहे. तुम्हा सर्वांना मी पुरून उरलो आहे. तुम्ही माझे काही करू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे बजावले. तसेच माझ्या अटकेवेळी पोलिसांवर दबाव टाकणारे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात एका प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यांना न्यायालयात खेचणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले.

योगी ‘ढोंगी’ तर केंद्रीय गृहमंत्री निर्लज्ज
शिवसेनेने अपशब्द कधी काढले नाहीत का, असा सवाल करून उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील आक्षेपार्ह शब्दांची उजळणी राणेंनी केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना उद्धव ठाकरे ‘ढोंगी’ म्हणाले होते. शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना ‘थापडा’ मारण्याची मुख्यमंत्र्यांनी भाषा केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ते ‘निर्लज्ज’ म्हणाले होते, असे दाखले राणे यांनी दिले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातील ‌वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावे या मागणीकरिता नाशिक येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पोलिस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...