आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Champasingh Thapa Joint Shinde Group | Who Is Champasingh Thapa? In Family Nepal, Learn About Chappa, Two Boys Living Next Door To Balasaheb In Dubai

कोण आहेत चंपासिंह थापा?:मातोश्रीची 30 वर्षे केली सेवा, बाळासाहेबांची होते सावली; कुटुंब नेपाळमध्ये, 2 मुले दुबईत

सलमान शेख | मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावली सारखा मागे उभे राहणाऱ्या चंपासिंह थापा (वय 60) यांनी सोमवारी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेबांचा विश्वासू असलेल्या चंपासिंह थापांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेनेने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. थापा यांना शिंदेंनी पैसे दिले असतील, त्यामुळे ते त्यांच्यासोबत गेले असतील, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. थापा हे 1970 पासून बाळासाहेब ठाकरे यांचे वैयक्तिक सहकारी होते. 30 वर्षे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली. यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांचे फोन उचलण्याचे विशेष काम करणारे मोरेश्वर राजे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. राजे यांनी मातोश्रीमध्ये सुमारे 35 वर्ष घालवली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थापा आणि राजे यांचे आपल्या गटात स्वागत केले आहे. चंपा सिंह थापा यांची बाळासाहेबांची सावली अशी ओळख आहे. बऱ्याच वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंचे चंपासिंह हे सहायक होते. नेपाळहून 50 वर्षांपूर्वी चंपासिंह थापा मुंबईत आले होते. त्यावेळी के. टी. थापा हे नाव महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रात नावाजलेले होते. ते मुंबईचे नगरसेवक झाले. त्यानंतर मातोश्रीवर के. टी. थापा यांच्यासोबत चंपा सिंह थापा आले. तेव्हापासून चंपासिंह थापा, बाळासाहेब ठाकरे हे समीकरण जोडल्या गेले. चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

कोण आहेत चंपा सिंह थापा हे जाणून घेणे महत्वाचे आहे...

जीवाला जीव देणारे- थापा

चंपासिंह थापा हे साधारण 50 वर्षांपूर्वी नेपाळमधून भारतात काम करण्यासाठी आले होते. मुंबईतील गोरेगावमध्ये त्यांनी सुरुवातीला अगदी छोटी-मोठी कामे केलीत. त्यानंतर भांडूपचे नगरसेवक के.टी. थापांच्या ओळखीने ते मातोश्रीवर दाखल झाले. थंड पण भेदक डोळ्यांचा हा तरुण इमानदार आणि जिवाला जीव देणारा आहे, हे बाळासाहेबांच्या जाणकार नजरेने नेमके हेरले. तेव्हापासून थापा हे बाळासाहेबांची सावली बनले. त्यावेळी थापांचे वय अवघे 16 वर्ष इतके होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या रोजच्या गोष्टी या थापा सांभाळायचे.

बाळासाहेबांच्या शेजारी खोली

जेव्हा मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा थापांनी बाळासाहेब ठाकरेंची विशेष काळजी घेतली, त्यांच्या संपूर्ण काळामध्ये त्यांची साथ दिली. विशेष बाळासाहेब ज्या ठिकाणी झोपायचे अगदी त्या खोलीच्या शेजारी खापांची खोली होती. बाळासाहेबांचे दिनक्रम सांभाळणे आणि त्यांची सेवा करणे हे थापाने स्वत:चे व्रत मानले. त्यांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची आणि दिनक्रमातील प्रत्येक बारीकसारीक बाब नेमकी लक्षात ठेवून बाळासाहेबांची जिवापाड काळजी घेणारे थापा हे थोड्याच काळात मातोश्री परिवाराचे सदस्य झाले. शिवसेनेच्या वाढीच्या काळात सदैव त्यांनी बाळासाहेबांची सावली बनून साथ दिली.

बाळासाहेबांना चहा करून द्यायचे

बाळासाहेबांना चहा खूप आवडायचा. त्यामुळे ते चहा बनवून देण्याचे काम देखील थापा करायचे. अगदी सकाळी उठून थापा बाळासाहेबांना चहा द्यायचे व रात्री ते झोपल्यावरच झोपायचे.

बाळासाहेबांनी थापांना केला प्रश्न

सोबत काम करताना बाळासाहेबांनी त्यांना "काम सोडायचं आहे का? तुला दुसरीकडे इज्जत तरी मिळेल" असा प्रश्न केला होता. त्यावर थापा म्हणाले होते की, "इज्जत नाही तर पैसा मिळवण्यासाठी मुंबईत आलोय आणि इज्जत तर तुमच्यामुळे मिळतेच आहे.

त्यावेळी डोळ्यात पाणी येते

एकदा थापा म्हणाले होते की, "मी जेव्हा कधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत बाहेर जातो, तर लोक माझ्या पायाला हात लावतात. कारण मी बाळासाहेबांची सेवा केली आहे. हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी येते.

नेपाळमध्ये सेनेची शाखा

चंपा सिंह थापाचे कुटुंब नेपाळात असून, त्यांचे दोन मुले दुबईत असतात. वर्षांतून कधीतरी ते कुटुंबियांकडे जातात. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा विस्तार करण्याच्या पहिल्या प्रयोगाला थापाचा मोठा हातभारही लागला. नेपाळमध्ये शिवसेनेची उभारणी करण्यात थापांची भूमिका महत्त्वाची होती.

अखेरच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांसोबत

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर चंपा सिंह थापा चर्चेत आले. थापा हे बाळासाहेबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबतच होते. बाळासाहेबांचे निधन होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा संवाद थापा याच्यांशीच केला होता. भांडूपमधील तत्कालीन नगरसेवक दिवंगत के टी थापा यांच्यामुळे थापा हे बाळासाहेबांचे सेवक म्हणून रुजू झाले होते. थापा हे बाळासाहेबांची सावली बनून त्यांच्या सोबत राहिले. बाळासाहेबांनी थापा यांना कायम मातोश्रीवर ठेवण्याचे उद्धव ठाकरेंना सांगितले होते. थापा यांना बाळासाहेबांनी कुटुंबातील सदस्याचा दर्जाही दिला होता.

थापाबाबत प्रश्न

उद्धव ठाकरे यांच्यासोबत कालपर्यंत मातोश्रीवर राहणारे थापा अचानक ठाकरे घराणे सोडून शिंदे गटात गेल्यामुळे हे का आणि कसं घडलं असे अनेक प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहेत.

बातम्या आणखी आहेत...