आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार ‘रिफायनरी’चा निर्णय घेण्याची शक्यता:प्रकल्पाला विरोध करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना तडीपार नोटिसा

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजवर दोन ते तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विराेधकांनी सळाे की पळाे करून साेडल्यानंतर आता सरकार कोकणात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पही हातून जाऊ नये यासाठी काळजी घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राज्यात बहुचर्चित राजापूर बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध मोडून काढण्याची तयारीच शिंदे सरकारने केली आहे.

हा प्रकल्प झाल्यास जवळपास एक लाख रोजगार व चार ते पाच लाख लाेकांना पूरक राेजगार उपलब्ध होणार आहेत. मात्र सातत्याने विरोध होत असल्याने हा प्रकल्प खोळंबला आहे. याबाबत येत्या काही दिवसांत राज्य सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तडीपार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून म्हणणे मांडण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी बुधवारी जामीनदारासह जबाब देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा तडीपार प्रस्तावास मंजुरी दिली जाऊ शकते.

रिफायनरीविरोधात भूमिका घेतलेल्या पदाधिकाऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीत ‘तुमच्या या वर्तनामुळे राजापूर पोलिस ठाणे हद्दीतील गोवळ, बारसू, शिवणेखुर्द या परिसरातील शांतताप्रिय जनतेच्या जीवितास धोका, भय व असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असून लोकांना जीवन जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक राजापूर यांनी तुम्हाला तडीपार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे,’ असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

नाणारची अधिसूचना रद्द झाल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू परिसरातील जागा उपलब्ध असून केंद्राने निर्णय घ्यावा, असे पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना पाठवले होते. पण शिवसेनेने प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली. याच वेळी हा प्रकल्प राजापूर येथे हवा यासाठीही रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ संघटनही उभारण्यात आले असून प्रकल्प येथेच व्हावा यासाठी मोर्चाही काढण्यात आला. खासदार विनायक राऊत यांनी अनेकदा प्रकल्पविरोधी भूमिका मांडली आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी, उद्योगमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेते प्रकल्प व्हावा, यासाठी अनुकूल आहेत. हा प्रकल्प येथे झाल्यास जवळपास चार ते पाच लाख पूरक रोजगार उभे राहतील, असे सांगितले जात आहे.

लवकरच घाेषणेची शक्यता येत्या काही दिवसांत रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठी घोषणा राज्य सरकारकडून केली जाऊ शकते, आशी माहिती मिळत आहे. सगळ्याच प्रकल्पांना विरोध झाल्यास राष्ट्रीय पातळीवरही उद्योगक्षेत्रात राज्याबद्दल वेगळी प्रतिमा निर्माण होऊ शकते. यासाठी कोकणात प्रस्तावित असलेला हा रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

प्रकल्पाला अनेकांचे समर्थन रिफायनरीविरोधी संघटनांनी हा प्रकल्प प्रदूषणकारी असून येथील नैसर्गिक साधनसंपत्तीला बाधा पोहोचवणारा आहे, असा आरोप करून तीव्र आंदोलने केली आहेत. याच वेळी रिफायनरी समर्थकांनीही आंदोलने केली. पण आता राज्य सरकारने हा प्रकल्प हातून जाऊ नये यासाठी गंभीर दखल घेतली असून विरोध मोडून काढण्यासाठी विरोधकांना तडीपार करण्याच्या नोटिसा धाडल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...