आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Chandrakant Patil । If Balasaheb Thackeray Had Not Given Protection To Hindus In '93 Riots, There Would Be No Hindus Left In Mumbai Today

चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा:बाळासाहेब ठाकरे यांनी 93 च्या दंगलीत हिंदूंना संरक्षण दिले नसते तर मुंबईत आज हिंदू शिल्लक राहिला नसता- चंद्रकांत पाटील

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात दिसून आले आहे. त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातील नागरिकांना शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यादरम्यान अमरावतीत मोठ्य़ा प्रमाणात दगडफेकी करण्यात आली होती.

त्यानंतर भाजपने देखील शनिवारी बंदची हाक दिली होती, मात्र त्यादरम्यान आंदोलनाचे स्वरूप हिंसाचारात बदलल्याने पोलीसांनी आंदोलनांवर लाठीचार्ज केला. अमरावतीच्या घटनेनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

'आम्ही जसे संघाचे कार्यकर्ते आहोत, तसे बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणारे आहोत. त्यांनी आम्हाला हे चालणार नाही हेच शिकवले. बाळासाहेब ठाकरे यांनी असा बोटचेपेपणा केला असता तर 1993 च्या दंगलीत मुंबईतील हिंदू जीवंत राहिला नसता,' असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे.

'13 नोव्हेंबरची अमरावतीतील प्रतिक्रिया 'हिंदू मार नही खायेगा' अशी एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. तुम्ही म्हणाल मी चिथावणी देत आहे. पण खऱ्याला खरे म्हणायला आम्हाला भिती कधीच वाटत नाही. आम्ही जसे संघाचे कार्यकर्ते आहोत.'

'तसे बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणारे देखील आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी असा बोटचेपेपणा केला असता तर 1993 च्या दंगलीत मुंबईतील हिंदू जीवंत राहिला नसता,' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'महाराष्ट्र भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी हे जाहीरपणे मान्य करेल की बाळासाहेब ठाकरे यांनी 93 च्या दंगलीत हिंदूंना संरक्षण दिले नसते तर मुंबईत हिंदू शिल्लक राहिला नसता. त्या शिवसेनेचे वारसदार अमरावती, नांदेड, मालेगावमधील हिंसाचारावर काही बोलणार नाही.' असे म्हणत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

दरम्यान, अमरावतीमध्ये घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्रिपुरात अशी कोणत्याही प्रकारे घटना घडलेली नाही. अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

“अमरावतीमधील एकूणच घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. पहिल्यांदा सर्वांना विनंती करतो की अमरावतीत शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार करू नये. पण ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतंय. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही, त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणे अत्यंत चुकीचे आहे.” असे फडणवीस म्हणाले.

“त्रिपुरा सरकार आणि त्रिपुरा पोलिसांनी स्वत: जी मशीद जाळली होती म्हणून ही सगळी आंदोलने होत आहेत, त्या मशिदीचे फोटो जारी केले आहेत. शिवाय सोशल मीडियावर कशा प्रकारे हे खोटे फोटो टाकण्यात आले हे देखील प्रकाशित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पेटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित लोकांवर कारवाई देखील केली आहे”,अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

कोणतीही मशीद त्रिपुरामध्ये जाळण्यातच आलेली नाही. असे असताना त्या अफवांवर महाराष्ट्रात मोर्चे काढायचे आणि त्यावर हिंदूंची दुकाने जाळायची हे देखील योग्य नाही. सरकारने यावर कडक कारवाई केली पाहिजे. सरकारी पक्षाचे नेते स्टेजवर जाऊन भडकवणारी भाषणे करणार असतील, तर या दंगलींची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळे कुणीही महाराष्ट्रात दंगल करू नये आणि अशा प्रकारे मोर्चे काढून विनाकारण हिंदूंची दुकाने टार्गेट करणे हे देखील बंद झाले पाहिजे आणि दोन्ही समाजांनी शांतता पाळली पाहिजे. असे आवाहन देखील फडणवीसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...