आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेहूत संत तुकोबांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावे, ही पंतप्रधान मोदींची इच्छा होती. मात्र, अजित पवार यांनीच बोलण्यास नकार दिला, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त मुंंबईत आज भाजपची आढावा बैठक होत आहे. त्यापूर्वी चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते.
मी स्वत: संवाद ऐकला
देहूतील कार्यकर्मात आयोजकांनी मोदी यांना बोलण्याची विनंती केल्यानंतर मोदी यांनी बोलण्यास उभे न राहता प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची विनंती केली. मात्र, मी आधीच बोलणार नसल्याचे सांगितले होते, असे अजित पवार यांनी मोदींना सांगितले. त्यानंतरही मोदींनी अजित पवार यांना बोलण्याची विनंती केली. मात्र, अजित पवारच उठले नाहीत, असे चंदक्रांत पाटील म्हणाले. तसेच, हे घडले तेव्हा मी पवारांच्या बाजूलाच बसलो होतो. मोदी व पवार यांचा सर्व संवाद मी स्वत: ऐकल्याचे पाटील म्हणाले.
महाराष्ट्राचा अपमान कसा?
उपमुख्यमंत्री अजित पवार सभेत बोलले नाहीत, याचा अर्थ महाराष्ट्राचा अपमान झाला असा होत नाही. सभेत पंतप्रधान मोदी बोलले आहेत. ते सर्व राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामध्ये महाराष्ट्रही येतो. त्यामुळे उगीचच या विषयाला राजकारणाशी जोडू नये, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच, सभेत देहूच्या संस्थानचे अध्यक्ष, तसेच, पंढरपूर, आळंदी संस्थानचे अध्यक्षही बोलले आहेत. लोकार्पण सोहळ्यालाही सर्व संस्थानांचे ट्रस्टी हजर होते. सोहळ्यात सर्वांचा सन्मान ठेवला गेला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
आणखी मोठा विजय
राज्यसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयापेक्षा मोठा विजय भाजप विधान परिषद निवडणुकीत मिळवेल, असा दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. विधान परिषद निवडणुकीत मला भाजपच्या विजयाची खात्री आहे. त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीसाठी घेतलेला गुलाल अजूनही जपून ठेवला आहे. विधान परिषद निवडणुकीत त्याचा वापर करणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने पूर्वयोजनाही तयार केली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आदित्य यांच्या दौऱ्यावर टीका
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. नास्तिक नेत्यांसोबत आघाडी करुनही आदित्य ठाकरे एवढे आस्तिक आहेत. त्याबद्दल आनंद वाटतो, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरून आंदोलन करत असलेल्या काँग्रेस नेत्यांना तुमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास नाही, असा सवाल चंदक्रांत पाटील यांनी केला. तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या. त्यावरुन आंदोलन करण्याचे काहीच कारण नाही, असे पाटील म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.