आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेतही सहा जागा जिंकणार:चंद्रकांत पाटील म्हणाले, फडणवीसांच्या परफेक्ट प्लॅनमुळे विजय, करेक्ट कार्यक्रम 20 तारखेला

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील राज्यसभा निवडणूक निकालावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. सहावी जागा जिंकून भाजपने यश मिळवल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले की, देवेंद्रजी यांनी परफेक्ट प्लॅन करून सहावी जागा आणली. महाडिकांना 41.5 मते मिळाली, राऊतांना सहाव्यांना क्रमांकावर जावं लागलं, त्यांना 41 मते मिळाली. देवेंद्रजींनी हे ठरवलं होतं की, मविआ उमेदवारापेक्षा आपल्या उमेदवाराला अर्धा मत जास्तच मिळायला पाहिजे आणि तसंच झालं. संजय राऊत हे सहाव्या क्रमांकावर गेल्याचा आनंद मला आणि देवेंद्र फडणवीसांना झाला आहे."

संजय राऊतांवर केसेस लावणार का?

केंद्रीय यंत्रणांचा भाजपने दुरुपयोग केल्याचा शिवसेनेच्या आरोपावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाचता येईना अंगण वाकडे, मला कोणाचं समर्थन करायचं नाही, पण महाराष्ट्रात तुमची सत्ता असताना एका साध्या अभिनेत्रीला (केतकी चितळे) या पोलिस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात फिरवलं जातंय, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केवळ एक थोबाडीत लगावली असती या विधानावरून तुरुंगात टाकलं होतं, तर मग काल संजय राऊत यांनी हात तोडून टाकेन अशी भाषा वापरली, मग लावा आता त्यांच्यावर केसेस. सत्तेचा दुरुपयोग तर हेच करत आहेत.

'विरोधकांचाच राज्यघटनेवर विश्वास नाही'

विरोधकांवर टीका करत पाटील म्हणाले की, तुमचा या देशामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास नाही. घटनेवर विश्वास नसल्यामुळेच तुम्ही विधानसभा अध्यक्ष निवडीचा गुप्त मतदान पद्धतीचा कायदा बदलला. म्हणून रडीच्या डावाचा काही विषय नाही. भाजपचेही दोन आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळलेच ना. त्यामुळे आयोगावर आक्षेप घेणं चुकीचं आहे.

सामान्य कार्यकर्त्याला हरवण्यासाठी भाजपने पैशांचा अक्षरश: पाऊस पाडला या राऊतांच्या आरोपावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही संजय पवारांना हरवलं नाही. ते माझ्या घरातील आहेत. वाटल्यास विचारा पवारांना. पण मला शेवटी माझा पक्ष मोठा आहे. आम्ही मतं फोडली नाहीत, ती आम्ही मिळवली. सत्ताधाऱ्यांनीच निधीची धमकी, आमिष दाखवून घोडेबाजार भरवण्याचा प्रयत्न केला. "

विधान परिषदेतही सहा जागा जिंकणार

विधान परिषदेतही आम्ही सहा जागा जिंकणार असल्याचंही पाटील म्हणाले. ते म्हणाले की, हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही. हे गणित आहे. कारण पाहा मत दाखवून टाकायला लागतं तिथं आम्हाला 11 मते जास्त मिळाली, तर जिथे मत न दाखवता टाकायचं असतं, तिथे काय होईल! 20 तारखेला हा चमत्कार दिसेल असेही पाटील म्हणाले.

सुडाचं राजकारण चुकीचं

संजय राऊतांनी ज्यांची मतं फुटली त्यांची नावं आमच्याकडे असल्याचं म्हटलं होतं. त्यावर पाटील म्हणाले की, इथे त्यांची कार्यपद्धती चुकते. हे सुडाचं राजकारण गेली अडीच वर्षे सुरू आहे. या सरकारला सत्तेत राहून वाटतंय की, याला उचलू, त्याला उचलू, मी तीन पानी नोट देऊ शकतो की, या सरकारने फडणवीस सरकारची कोणकोणती लोकोपयोगी कामे रद्द केली. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन अडीच वर्षे झाली, पण एकही केस ते जिंकू शकले नाहीत. आता करेक्ट कार्यक्रम 20 तारखेला असल्याचंही ते म्हणाले.

प्रतिस्पर्ध्याचं मनमोकळं कौतुक पवारांकडून शिकण्यासारखं

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, सकाळी पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला, असे पवार म्हणाले होते. प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे.

बातम्या आणखी आहेत...