आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष ‘राज’धानीवर:मनसेशी सलगी, भाजप नेत्यांच्या दिल्लीत भेटीगाठी, मुंबईत चंद्रकांत पाटील-राज ठाकरे भेट; दिल्लीत फडणवीस-शेलार-शहांत खलबते

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाटील-राज भेटीआड दिल्लीतील भेटींची माहिती लपवण्याचा प्रयत्न ?

महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणाला पुन्हा उकळी फुटली आहे. राज्यात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात शुक्रवारी भेट झाली. दुसरीकडे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार दिल्लीत अमित शहा यांना भेटून आल्याचे वृत्त आहे. तसेच चंद्रकांत पाटीलही शनिवारपासून ४ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. या घडमोडीत काय नवीन समीकरणे शिजतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कृष्णकुंजवर राज ठाकरे व चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांत ४० मिनिटे चर्चा झाली. पुढील वर्षी होत असलेल्या मुंबईसह १० महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेत नवी युती उदयास येण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, भेटीत युतीची चर्चा झाली नाही, अशी सारवासारव पाटील यांनी केली. या भेटीदरम्यान राज यांचे पूत्र अमित, पत्नी शर्मिला, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर आदी उपस्थित होते.

राज यांनी भूमिका बदलावी : फडणवीस
राज ठाकरेंचा पक्ष आणि भाजपात हिंदुत्व हा समान धागा असला तरी त्यांची परप्रांतीयांबद्दलची जी भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नाही. त्यावर त्यांची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. आमच्यासाठी त्याचे निराकरण होणे आवश्यक आहे.- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
परप्रांतीयांच्या विरोधाचे चित्र बदलावे : पाटील

‘राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष परप्रांतीयांच्या विरोधात असल्याचे चित्र आतापर्यंतचे आहे. ते बदलण्याची आवश्यकता आहे. त्यांची भूमिका जोवर व्यापक होत नाही, तोवर आम्हालाही थोड्या मर्यादा असणार आहेत. लगेचच दोन्ही पक्षांची युती होईल आणि निवडणुकीवर चर्चा होऊन जागावाटप वगैरे ठरेल असे नाही.’ - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप

मुंबईत काँग्रेसचीही बैठक : मुंबईत काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेत बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांवर ५० मिनिटे चर्चा झाली. तथापि, यात आघाडी करण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले, महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा आमचा निर्णय ठाम आहे.

पाटील-राज भेटीआड दिल्लीतील भेटींची माहिती लपवण्याचा प्रयत्न ?
मुंबई | चंद्रकांत पाटील-राज ठाकरेंच्या भेटीआड भाजप नेत्यांच्या दिल्लीतील भेटीगाठींची माहिती माध्यमांपासून लपवली जात असल्याची चर्चा आहे. फडणवीस यांच्या कार्यालयाने अशी भेट झाली नसल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या मुद्द्यांवर ही भेट असती तर ती माध्यमांपासून लपवली नसती, असेही म्हटले जाते. मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपमध्ये अनेक फेरबदल होऊ शकतात. राज्याच्या राजकारणाबाबतही भाजपकडून चाचपण्या सुरू असल्याचे समजते.

भाजपची मनसेशी जवळीक का ?
भाजप व मनसेची युती निश्चित आहे. या जाहीर भेटी केवळ वातावरण निर्मितीचा भाग असल्याचे मानले जाते. मनसेच्या मागे सध्या मतांचे विशेष बळ नाही. मात्र राज यांचा वक्तृत्वाचा मोठा प्रभाव पडतो. त्याने खासकरून मुंबई निवडणुकीत शिवसेनेला जेरीस आणण्याची भाजपची रणनीती आहे.

मनसेशी युतीचे फायदे अन् तोटे काय?
- मनसेशी युती केल्यास भाजपला पुणे, नाशकात फायदा होऊ शकतो. शिवसेनेची मुंबईतील मराठी मते फोडण्यासाठी मनसेची भाजपला गरज आहे. म्हणून राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा विचार भाजपमधील एक गट करतो आहे.
- भाजपची मुंबईत सर्व मदार उत्तर भारतीय मतदारांवर आहे. परप्रांतीयांविरोधात राज यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या मुंबईतील उत्तर भारतीय व्हाेट बँकेला फटका बसण्याची भीती भाजपला वाटते. याबाबत भाजपत खलबते सुरू आहेत.
- काही दिवसांपूर्वी शरद पवार शहांना भेटले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांशी शहांनी खलबते केल्याने अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. तसेच काही आठवड्यांपूर्वी संजय राऊत-आशिष शेलार यांचीही भेट झाली होती.

बातम्या आणखी आहेत...