आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विटी दांडू, मंगळागौरीलाही खेळाचा दर्जा देऊ शकतो:चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले - समाजाची दिशाभूल करू नका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहीहंडीला खेळाचा दर्जा देत गोविंदांना शासकीय नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर कुणी मागणी केल्यास देशी खेळ विटी दांडू आणि मंगळागौरीलाही राज्य सरकारकडून खेळाचा दर्जा दिला जाऊ शकतो, असे प्रत्युत्तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

गोविंदांना वेगळे आरक्षण नाही

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, गोविंदांना शासकीय नोकरीत वेगळे 5 टक्के आरक्षण दिलेले नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे. शासकीय नोकरीत विविध प्रकारच्या खेळाडूंना 5 टक्के आरक्षण आहे. यामध्ये किमान 22 ते 25 खेळ आहेत. त्यामध्ये फक्त आणखी एक खेळ म्हणजेच दहीहंडीचा समावेश केला आहे. म्हणजेच गोविंदांना याच कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. फक्त गोविंदांना 5 टक्के आरक्षण असा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या निर्णयावरुन एवढा वाद होण्याचे कारण काय, हे समजत नाही.

दहीहंडीच्या स्पर्धा होतील

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या खेळांमध्ये खेळाडूंनी विशेष प्राविण्य दाखवल्यास त्यांना क्लास 3, क्लास 4 अधिकारी पदासाठी संधी दिली जाते. यासाठी त्या खेळांच्या स्पर्धा होणे आवश्यक असते. त्यामुळे राज्य सरकार आता दहीहंडी खेळाच्याही स्पर्धा भरवणार आहे. त्यात विशेष प्राविण्य दाखवणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीत संधी दिली जाईल. एवढा सोपा विषय असताना विरोधक या मुद्द्यालाल अवघड करुन जनतेसमोर मांडत आहेत. त्यांनी कृपया जनतेची दिशाभूल करु नये.

विटी दांडू, मंगळागौरीचाही समावेश करु

राज्य सरकारने कोणताही विचार न करता दहीहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा देत गोविंदांना आरक्षण देण्याची घोषणा केली, अशी टीका अजित पवारांनी केली आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणांहून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला. पुढे आपले देशी खेळ जसे की, विटी दांडू तसेच मंगळागौरीला खेळाचा दर्जा देण्याची मागणी केल्यास, तसाही निर्णय घेता येईल. पुढे या खेळांच्या स्पर्धा होतील. त्यानुसार खेळाडूंना क्लास 2, क्लास 3 अधिकारपदाची संधी दिली जाईल.

फडणवीस जातीपातींच्या वर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, फडणवीस हे जातीपातींमध्ये अडकलेले नेते नाहीत. फडणवीस हे आपल्या कर्तृत्वातून समोर आले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे.

बातम्या आणखी आहेत...