आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Chandrasekhar Bawankule Interview: ​​​​​​​Pankja Munde Does Not Have A Ministerial Position In The State, According To Bawankules; Will Take Over Baramati Seat In 2024

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हभाजप - शिंदे सेनेची युती:​​​​​​​पंकजांना राज्यात मोठी जबाबदारी नाही, बावनकुळेंची माहिती; 2024 मध्ये बारामतीची जागा जिंकणार

विनोद यादव । मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकसभेत 45 अन् विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा निर्धार व्यक्त

येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप शिंदे सेनेसोबत युती करणार आहे. लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा जास्त आणि विधानसभा निवडणुकीत युतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळवू, असा निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते दिव्य मराठीशी दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

बावनकुळे म्हणाले की, पंकजा मुंडे हे ज्येष्ठ नेतृत्व आहे. त्यांच्याकडे केंद्रीय जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याकडे काही जबाबदारी नसेल. तसेच बारामतीची जागा 2024 मध्ये भाजपच्या ताब्यात असेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

- मिशन 45 साठी आपली व्यूहरचना काय आहे? तुमच्या दृष्टीने यातील टॉप पाच मतदारसंघ कोणते जे भाजप मिळवेलच?

- आम्ही महाराष्ट्रातील सर्व लोकसभा जागांवर सक्षम बूथ मोहीम राबवत आहोत. एका बूथवर 30 कार्यकर्ता आणि प्रत्येक मतदार यादीच्या पेजवर एक कार्यकर्ता तैनात करण्याच्या योजनेवर आम्ही काम सुरू केले आहे. आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर 50 युवा वारियर्स म्हणजेच 15 ते 25 वयोगटातील युवा कार्यकर्ते तयार करत आहोत. संघटनेच्या माध्यमातून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याण योजना, केंद्र सरकारच्या सर्व योजना, फडणवीस-शिंदे सरकारने महाराष्ट्रातील गरजू लोकांसाठी तयार केलेल्या योजना पात्र लोकांपर्यंत नेण्याचा नियोजन करत आहोत. अशा प्रकारे एकीकडे संघटना मजबूत करायची आणि दुसरीकडे गरीब कल्याणाच्या योजना राबवायची अशी रणनीती आम्ही तयार केली आहे. अशाप्रकारे सत्ता आणि संघटना या दोन्ही गोष्टी एकत्र करून आपण पुढे जात आहोत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला 45 पेक्षा जास्त जागा आणि विधानसभा निवडणुकीत युतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील याची मला खात्री आहे. राहिला प्रश्न टॉप पाच मतदारसंघांचा, तर मी स्पष्ट करू इच्छितो, की आम्ही सर्व 48 जागा पूर्ण ताकदीने लढवू आणि 45 पेक्षा जास्त जागा जिंकू.

- बारामती हे मुख्य लक्ष्य असेल का?

- बारामती लोकसभा मतदारसंघात काही वेगळेच दाखवले जात आहे. भाजपला ही जागा जिंकणे खूप सोपे आहे. आतापर्यंतच्या इतिहासात बारामतीत भाजपने चांगलीच लढत दिली आहे. मात्र, आता 2024 मध्ये बारामतीची जागा भाजपच्या ताब्यात असेल.

- शिवसेना उद्धव गट व शिंदे गटातील खासदारांचे मतदार संघ यात आहेत. राज्यातील सत्तेत युती आहे. लोकसभेसाठी लढत एकमेकांच्या विरोधात असेल?

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी युती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय संघटना महाराष्ट्राबाबत निर्णय घेईल. त्यानुसार राज्यात काम करणार आहोत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवारांना भाजप पूर्ण ताकदीने पाठिंबा देणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवारांना भाजप आजवर ज्या प्रकारे पाठिंबा देत आला आहे, तसाच पाठिंबा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उमेदवारांनाही देऊ. आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांप्रमाणेच शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही व्यूहरचना तयार केली आहे.

- तुम्ही कार्यभार घेतल्यावर पहिली निवडणूक येईल ती स्थानिक स्वराज्य संस्थांची. आत्ता भाजपकडे किती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत? तुमचे लक्ष्य काय असेल?

- भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी युती करून निवडणूक लढवणार आहे. आम्ही निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होऊ, असा विश्वास वाटतो. स्थानिक स्वराज्य संस्थेनंतर प्रथम क्रमांकाचा पक्ष युती (भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना) असेल. आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एका बाजूला राहतील आणि आम्ही दोघेही एका बाजूला राहू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही ५१ टक्केची लढाई लढू.

- ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही राज्य पिंजून काढले. निवडणुकीच्या प्रचारात याबाबत काय रणनिती असेल?

- ओबीसी आरक्षणाची लढाई आम्ही जिंकली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या पहिल्याच बैठकीत बांठिया आयोगाची शिफारस मान्य करून न्यायालयात मांडण्यात आली. यासोबतच सरकारने सॉलिसिटर जनरल यांना आवश्यक ती माहिती दिली आणि कोर्टातही सरकारकडून योग्य भूमिका मांडण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयात सरकारने खटला जिंकला आहे. त्यामुळे आता राज्यात ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे.

- पंकजा ताईंना राज्यात काय जबाबदारी देणार?

- पंकजा मुंडे या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. यासोबतच त्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारीही आहेत. तसेच पंकजा मुंडे आमचे ज्येष्ठ नेतृत्व पण आहेत. त्या केंद्रात राष्ट्रीय सचिव आहेत त्यामुळे राज्य संघटनेत येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना सध्या राज्यात कोणतीही जबाबदारी दिली जाणार नाही.

- राज ठाकरेंचा पक्ष मनसेसोबत भविष्यात युती होणार का?

- मी नुकतीच राज ठाकरेंना भेटलो, तेव्हा देवाची तिसरी शक्ती आमच्यामध्ये बसली होती. आमच्यात फक्त कौटुंबिक चर्चा झाली. देव याला साक्षी आहे. मी कौटुंबिक पद्धतीने राज ठाकरेंना भेटायला गेलो होतो. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर मी तिथे जाऊ शकलो नाही. मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची भेट घेणे आवश्यक होते. कारण ते महाराष्ट्राचे एक जबाबदार नेते आहेत. याशिवाय महाराष्ट्र हित आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन ते राज्यात चांगली कामगिरी करतात. काहीवेळा ते भाजपवरही भाष्य करतात. हे बाजूला ठेवून मी त्याला भेटलो. एक चांगला नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना जनतेचा चांगला पाठिंबाही आहे. त्यांना भेटायला काय हरकत आहे? राज ठाकरेंचा पक्ष मनसेसोबत युती करण्याबाबत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करायचे ठरवतील.

बातम्या आणखी आहेत...