आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी अन् भाजपमध्ये जोरदार राजकारण तापले आहे. मुंबई बँक प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, भाजप आता आक्रमक झाली आहे. त्यानंतर आता भाजपचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळातील महावितरणच्या कामांची चौकशी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.
त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आता महाविकास आघाडी सरकारला खुले आव्हान दिले आहे. ‘गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारला चौकशी करावीसी वाटली नाही. आता महावितरणच्या तीन विभाग संचालकांकडून चौकशी करवून काय मिळणार आहे? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा’, असे थेट आव्हान बावनकुळे यांनी राज्य सरकारला दिले आहे. ते आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते.
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळातील कामाची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यावर बावनकुळे यांनी भाष्य केले ते म्हणाले की, "महावितरणचे संचालक चौकशी कसे करणार आहेत, त्यासाठी समितीची व्याप्ती वाढवावी लागेल, त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी व त्याचा निकाल महिन्याभरात लावावा", असे खुले आव्हान त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, चौकशीचा ठपका लावून अहवाल तयार करायचा आणि महाराष्ट्रातील 16 शहरांच्या खासगीकरणाचा घाट घालायचा असा यामागचा प्रयत्न असू शकतो. देवेंद्र फडणवीस सरकारने लोडशेडींग मुक्त महाराष्ट्र केला. एक शेतकरी–एक डीपी योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग दाखवला. आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली. आमच्या सरकारनेच एलीफेंटाला वीज पोहोचवली. राज्यातील 7 लाख 50 हजार शेतकऱ्यांना नव्याने वीज कनेक्शन मिळवून दिले. 45 लाख शेतकऱ्यांना 28 हजार कोटींची वीज दिली असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पण इतके चांगले काम करुनही आत्ताच चौकशी का? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.