आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रशेखर बावनकुळे यांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा:औरंग्या 'राष्ट्रवादी'चे श्रद्धास्थान, क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही 'जी' म्हणू शकत नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंजेबजी असा केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन त्यांच्यावर सर्वबाजूने टीका होत असताना त्यांनी अशा नीच, क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही 'जी' म्हणू शकत नाही. औरंग्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रद्धास्थान आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

नेमके काय म्हणाले होते बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत असताना त्यांनी औरंगजेबाचा 'औरंगजेबजी' असा उल्लेख केला होता. जितेंद्र आव्हाड स्टंटबाज माणूस आहे, नौटंकी आहे. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असते. ते औरंगजेबजी यांना क्रूर मानत नाहीत. असे हिंदीमधून बोलताना बावनकुळेंनी 'औरंगजेबजी' असा उल्लेख केला होता.

बावनकुळेंची सारवासारव

चंद्रशेखर बावनकुळेंवर चहुबाजूंनी टीकेच्या फैरी झडत असल्याने त्यांनी एक ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, क्रूरकर्मा, पापी औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे प्राण घेतले. औरंग्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले. अशा नीच, क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही 'जी' म्हणू शकत नाही. औरंग्या तो पापी औरंग्याच!!

तो आव्हाड यांच्यासाठी 'जी'

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, क्रूरकर्म्या औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत असताना, पत्रकाराने हिंदीतून प्रश्न विचारला. या प्रश्नाला हिंदीतून उत्तर देत असताना मी ‘जितेंद्र आव्हाड हे औरंगजेबजीला क्रूर मानत नाहीत‘असे उपरोधाने म्हटले. क्रूरकर्मा औरंग्या हा आव्हाड यांच्यासाठी 'जी' आहे, असे मला म्हणायचे होते. पापी औरंग्याला मी कशाला जी म्हणू? यातील उपरोध जर या लोकांना कळत नसेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढे कमीच आहे.

शब्दच्छलात अडकवू नका

चंद्रशेखर बावनकुळे आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणाले, आमच्या पक्षाची औरंग्याबाबतची भूमिका सर्वांना ठावूक आहे. औरंग्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रद्धास्थान आहे. हे आव्हाड्यासारख्यांनी अनेकदा सिद्ध केले आहे. आम्हाला नसत्या शब्दच्छलात अडकवून स्वतःला शुद्ध व स्वच्छ असल्याचे दाखवू नका. औरंग्याचे आणि तुमचे नाते जगाला ठाऊक आहे. असा टोला बावनकुळेंनी आव्हाड यांना लगावला.

बातम्या आणखी आहेत...