आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे ओवैसींसोबतही युती करतील:प्रकाश आंबेडकरांमागे संपूर्ण दलित मते आहेत काय?, संभाव्य युतीवर बावनकुळेंची टीका

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे हे गरज पडल्यास ओवैसींसोबतही युती करू शकतात. प्रकाश आंबेडकरांनी संपूर्ण दलित मते आपल्याकडे घेतली आहेत काय? प्रकाश आंबेडकर म्हणजे संपूर्ण दलित मते नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व वंचित आघाडीची युती होण्याचे संकेत आहेत. यासाठी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांची आज बैठक आहे. यावर आज पत्रकार परिषदेत बावनकुळेंनी भाष्य केले.

युतीमुळे फरक पडत नाही

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंसोबत गेल्यास भाजपला काहीही फरक पडणार नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करत आहे. भाजपचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे 51 टक्क्यांची लढाई आम्हीच जिंकणार आहोत.

मागासवर्गीय मते कुणाची जहागिर नाही

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मागासवर्गीय मते ही काही एका माणसाची जहागिर नाही. आपले हित जो नेता पाहतो, त्याच नेत्याच्या मागे जनता जाते. यात कोणी आता जात-पात पाहत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागासवर्गीयांच्या हितासाठी अनेक चांगले निर्मय घेतले आहेत. द्रौपदी मूर्मू यांना राष्ट्रपती केल्याबद्दल विदर्भातील जवळपास 75 हजार आदिवासींनी 'धन्यवाद मोदीजी', असे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत मागासवर्गीय भाजपला पाठिंबा देतील, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.

ठाकरेंनी काँग्रेसची घटना स्वीकारावी

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी स्वत:चा पक्ष संपवण्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या सर्व केल्या आहेत. आता त्यांनी एक काम करावं. निवडणूक आयोगाकडून काँग्रेस पक्षाच्या घटनेची झेरॉक्स कॉपी काढावी आणि तिच आपल्या पक्षाची घटना करुन टाकावी. एवढंच बाकी राहिलं आहे.

सीमावादावर नरमाईची भूमिका नाही

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज्य सरकारने नरमाईची भूमिका घेतली, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर बावनकुळे म्हणाले, सीमावादावर सरकारने नरमाईची भूमिका घेतलेली नाही. गेल्या 65 वर्षांत सीमाभागात विकास झालेला नाही. त्यामुळे जे सरकार सुविधा देईल, तिकडे जाण्याचा लोकांचा कल आहे. शिंदे-फडणवीस सरकारने याच मुद्द्यावर लक्ष केंद्रीय करुन सीमाभागात सुविधांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.

शिवरायांच्या अवमानाचे समर्थन नाही

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. लाड यांनी आपले वक्तव्य चुकले असेही म्हटले आहे. तसेच, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यावर बावनकुळे म्हणाले, सध्या व्हिडिओ कटछाट करून व्हायरल करण्याचा ट्रेंड सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कोणीही करू नये. अशा पद्धतीने कुणी वक्तव्य करत असेल तर भाजप त्याचे समर्थन करू शकत नाही, असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...