आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्या कॉलेजमधील विद्यार्थी मारहाण प्रकरणाची चौकशी करा:भुजबळांची विधानसभेत मागणी, पाटील म्हणाले - 2 दिवसांत अहवाल

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

के. जे. सोमय्या कॉलेजमधील विद्यार्थी डहाणू येथे शिबिरास गेले असताना शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना अर्धनग्नकरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात केली. त्यावर दोन दिवसात सविस्तर अहवाल सभागृहात सादर केला जाईल अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नात म्हटले की, मुंबई पूर्व उपनगरातील नामांकित के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील १३ ते १४ विद्यार्थी डहाणू (जि. पालघर) येथे राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरासाठी गेले असता एका प्राध्यापकाने या विद्यार्थ्यांना अर्धनग्न करून मारहाण केली. मात्र, अंशतः खरे आहे असे उत्तर कसे देता.अंशतः मारहाण केली का? तसेच, विद्यार्थ्यांना मारहाण करून अर्धनग्न अवस्थेत थंडीत दोन तास उभे करून ठेवण्यात आले ही घटना घडल्यानंतर हे विद्यार्थी प्रचंड मानसिक दबावाखाली आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे तक्रार करुनही अद्यापपर्यंत सदर प्राध्यापकावर कोणतीच कारवाई केली नाही. मात्र, विद्यार्थी मानसिक दबावाखाली नाही असे उत्तर मात्र विभागाने दिले.

विद्यार्थ्यांवर या घटनेचा परिणाम झाला नाही, हे कोणत्या फुटपट्टीवरून मोजले, असा छगन भुजबळ यांनी सरकारला सवाल करून शासनाने चौकशी करून संबंधितांविरुध्द कोणती कारवाई केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी दिलेल्या उत्तरात मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मारहाणीच्या या घटनेची महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाद्वारे चौकशी करण्यात येत आहे. घडलेल्या घटनेबद्दल प्राध्यापकाला निलंबित केले आहे आणि विद्यापीठाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते निलंबित राहतील. महाविद्यालयाचे व्यवस्थापन याची चौकशी करत आहेत. याबाबतचा अहवाल सभागृहासमोर दोन दिवसात सादर करण्यात येईल तसेच दोषी आढळल्यास शिक्षकाला कायमस्वरूपी निलंबित करण्यात येईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...