आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ नये यासाठी नाफेडच्या माध्यमातून प्रत्यक्षात बाजार समितीत कांदा खरेदी करण्यासोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात केली.
शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत निर्णय विचाराधीन असून, लवकरच या निर्णयाची घोषणा केली जाईल याबाबत सभागृहासमोर प्रत्यक्ष निवेदन करण्यात येईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
छगन भुजबळ यांनी आज सभागृहात नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीबाबत वस्तुस्थिती सभागृहासमोर ठेवत सत्यता मांडली. ते म्हणाले की, नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी ही काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या व व्यापाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात कुठलीही वाढ झालेली नसून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही.
नाफेडच्या माध्यमातून प्रत्यक्ष बाजार समितीत लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन खरेदी करण्यात यावी. त्यामुळे लिलाव प्रक्रियेतून शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळू शकणार आहे. तसेच त्यातूनही जर योग्य भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शासनाने ताबडतोब पाऊल उचलून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी सभागृहात केली.
उत्तरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कांदा खरेदीसाठी नाफेड मार्फत राज्यात एकूण दहा केंद्र सुरू करण्यात आले असून, सध्या तीन फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 18 हजार 743 क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला आहे.
भुजबळांच्या मागणीवर ते म्हणाले की, नाफेड बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष कांदा खरेदीमध्ये सहभाग घेईल तसेच कांदा शेतकऱ्यांना अनुदान देणे विचाराधीन आहे. समितीच्या अहवालानंतर लवकरच याबाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदान घोषित करण्यात येईल. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.