आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समता परिषदेची बैठक:देशात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, त्यासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज - छगन भुजबळ

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''देशात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, जनगणनेसाठी देशव्यापी आंदोलनाची गरज आहे. जो पर्यंत ओबीसींची आकडेवारी कळणार नाही तो पर्यंत ओबीसी आपल्या हक्कापासून वंचित राहतील यासाठी जनगणना झालीच पाहिजे'' अशी आग्रही मागणी राज्याचे माजी उमुख्यमंत्री व समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली.

आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारीणीची बैठक मुंबईत पार पडली यावेळी ते बोलत होते.

..तसे विरोधकही सर्वच पक्षात

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना छगन भुजबळ म्हणाले की, सर्वच पक्षात जसे फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचे लोक आहेत, तसेच सर्वच पक्षात या विचारांचे विरोधक सुद्धा आहेत मात्र आपण समता परिषदेच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार जनतेत पसरविणे हे चालूच ठेवले पाहिजे. समता परिषदेचे अजेंडा हा गरिबांचा, मागासवर्गीयांचा आणि दलितांच्या उधारासाठी आहे. त्यामुळे समता परिषद ही मागासवर्गीय, वंचित, दलीत घटकासाठी नेहमी लढत आली आणि इथून पुढे देखील लढत राहील.

शरद पवारांबद्दल केले हे वक्तव्य

भुजबळ म्हणाले की, आज राजकीय परिस्थिती बदललेली पाहायला मिळते मात्र अश्या परिस्थिती मध्ये देशात पवार सोडले तर कोणताच नेता फुले शाहू आंबेडरांच्या वाटेने जाताना आढळत नाही. राजकारणात फक्त डोकी मोजली जातात त्यातला विचार मोजला जात नाही मात्र पवार साहेब आजही आपले विचार सोडत नाही हे सर्वात महत्वाचे आहे. माझ्या राजकीय वाटचालीत देखील मी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आणि तो शेवटपर्यंत देत राहील.

एकसंधतेचा ओबीसींना फायदा

समता परिषदेची व्याप्ती आपण वाढवली पाहिजे. प्रत्येक घरात हे फुले शाहू आंबेडकरांचे विचार गेलेच पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने काम करायला हवे. तुम्ही एकसंध राहिलात तर आणि तरच ओबीसी घटकाला फायदा होईल, विखुरलेल्या ओबीसी घटकाच्या वाट्याला काहीच येणार नाही. असे प्रखर मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले

प्रा. नरकेंच्या पुस्तकाचे प्रकाशन

यावेळी प्रा. हरी नरके यांनी लिहिलेल्या "महात्मा फुले: पर्यायी समाजव्यवस्थेचे शिल्पकार" आणि "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले" (हिंदी) या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

आज झालेल्या या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह, प्रा. हरी नरके माजी आमदार पंकज भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापु भुजबळ, उपाध्यक्ष दिलीप खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मुंबई अध्यक्ष सदानंद मंडलिक, प्रा.दिवाकर गमे,ॲड. सुभाष राऊत,बाळासाहेब कर्डक,मकरंद सावे,मंजिरी घाडगे, प्रा.कविताताई म्हेत्रे राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.