आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांना दिल्लीत घटनेला अभिप्रेत शासन आणायचंय:त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, छगन भुजबळांचे आवाहन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिल्लीत राज्यघटनेला अभिप्रेत शासन आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.

शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथून व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.
शरद पवार एक विद्यापीठ

छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांना देशात संविधानावर काम करणारे, राज्यघटनेला अभिप्रेत, लोकशाहीवर चालणारे, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे सरकार दिल्लीत आणि राज्यात अभिप्रेत आहे. शरद पवारांना अभिप्रेत असलेले शासन देशात आणणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.

छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार साहेब म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, शिक्षण, कला, संस्कृती, क्रीडा, साहित्य, शेती या विषयांचे चालत बोलतं विद्यापीठ आहे. शरद पवारांनी देशात नव्हे तर जगभरात महत्त्वाची माणसं जोडली.

शेती क्षेत्रात क्रांती केली

छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवारांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा कुटुंबियांकडून मिळालेला वारसा कायम जपला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशावर नाही तर जगावर उपकार आहे. त्यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सारखा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शेती क्षेत्रात त्यांच्यामाध्यमातून क्रांती झाली. त्यामुळे आज जगाला शेती उत्पादने निर्यात करणारा भारत हा महत्वपूर्ण देश बनला आहे. हे शरद पवारांचे योगदान आहे.

महिला आयोगाची स्थापना केली

छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवारांनी राज्यात महिला आयोगाची स्थापना केली. महिलांना आपले हक्क मिळवून दिले. महिलांना सर्व क्षेत्रात समान आरक्षण मिळवून दिले. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण उपलब्ध करून दिले.

वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी आवरावे

छगन भुजबळ म्हणाले, मंत्रालयात सर्व महापुरुषांच्या सोबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आली, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. परंतू त्यांच्याच मंत्रिमंडळात काम करणारे काही मंत्री महापुरुषांच्या विरोधात चुकीची टिप्पणी करत आहेत. हे योग्य नाही. या वाचाळवीरांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवरले पाहिजे आणि त्यांना कडक समज दिली पाहिजे.

दरम्यान, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जयशंकर फेस्टिवल लॉन्स बँक्वेट हॉल, औरंगाबाद रोड पंचवटी नाशिक येथे करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...