आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेची ही अवस्था झाली नसती. एवढे सगळे प्रकरण घडले नसते, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर दिली आहे. तसेच सरकार कुणाचेही असावे पण ते चांगले चालावे आमचे एवढेच मत आहे, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून पूर्वीपासूनच होती. त्याचा स्फोट फक्त आज झाला. जे चालले आहे, ते तुम्हीही बघत आहात आणि मीही बघतोय, काय निर्णय येतो बघू. सरकार कुणाचेही असावे पण ते चांगले चालावे आमचे एवढेच मत आहे, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. अहमदनगरच्या गुंडेगाव येथे प्रवेशद्वाराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
याशिवाय, संजय पवार यांच्या पराभवानंतर संभाजी राजे यांनी तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला होता. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।। तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।। असे संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये म्हटले होते.
संभाजीराजे आक्रमक का?
संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभा लढवायची होती. त्यांनी अपक्ष म्हणून आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. मात्र, शिववसेनेने त्यांना पाठिंबा द्यायला नकार दिला. राऊतांनी आमची 42 मते आम्ही अपक्षांना का देणार, असा सवाल केला होता. शिवाय पाठिंबा हवा असेल, तर संभाजीराजेंनी पक्षात प्रवेश करावा, अशी अट घालण्यात आली. ही अट राजेंच्या जिव्हारी लागली. त्यात राज्यसभा निवडणुकीत मते फुटल्याचेही समोर आले. शिवसेनेने संभाजी राजे ऐवजी संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यांचा पराभव झाला होता. यातच राज्यसभेच्या निकालानंतर अवघ्या 10 दिवसांत शिंदेंच्या बंडाने शिवसेना खिळखिळी झाली.
मविआ सरकार धोक्यात
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करुन 35 पेक्षा जास्त शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटातही प्रचंड हालचाल सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त करण्याचे सकेंत दिले आहेत. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या पक्षाच्या बैठका पार पडत असून राज्याच्या राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. या घडामोडी कोणत्या पातळीवर जाऊन पोहोचतात याबाबत मात्र प्रचंड उत्सुकता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.