आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांना प्रत्युत्तर:मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांत ‘वर्षा’वर ‘गुफ्तगू’; राज्यात भाजप नेत्यांना घेरण्याची तयारी! मुख्यमंत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेत्यांविरुद्ध पुरावे देऊनही राज्याच्या गृहमंत्रालयाकडून तडफेने कारवाई होत नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शुक्रवारी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दोन बैठका पार पडल्या. भाजप नेत्यांविरोधातील कारवाया आता गतिमान करण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे समजते. शुक्रवारी सकाळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह विभागावर असलेली शिवसेनेची नाराजी जाहीर केली. त्यानंतर गृहमंत्री तातडीने दुपारी १ वाजता ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटले. सुमारे तासभर ही बैठक झाली. मात्र, “ही बैठक पूर्वनियोजित होती. पाडव्याला पोलिस खात्याच्या ११२ हेल्पलाईनचे लोकार्पण आहे. त्यानिमित्त भेटलो’, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

या प्रकरणांची चाैकशी होणार
१. पीएसमी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांना धमकावून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या कंपनीत भागीदारी मिळवली आहे.
२. पवईतील पेरुबाग एसआरए प्रकल्पात सोमय्या यांनी ४३४ बोगस लाभधारक घुसवून ३०० कोटींचा भ्रष्टाचार केला.
३. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग आॅपरेशन प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह दिला. त्याप्रकरणी सीआयडी चौकशी लावली आहे.
४. गुप्तवार्ता विभागाच्या संचालक रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीस यांची आजपर्यंत चौकशी झालेली नाही.
५. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक बोगस मजूर नोंदणी प्रकरणी अटकेची कारवाई करण्यास मोठा विलंब होतो.
६. दिव दमणचे भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीसांकडून चौकशीस मोठा विलंब.
७. ईडीचे अधिकारी जितेंद्र नवलाणी यांच्या कुटुंबियांच्या कंपनीत मुबईतील १०० बिल्डरांनी पैसे ट्रान्सफर केले आहेत.
८. फडणवीस सरकारच्या काळात महाआयटीमध्ये सुमारे २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

राऊत, अधिकारी अन् गृहमंत्र्यांत ‘वन टू वन’ केसवर चर्चा

नाराजीच्या बातम्या तथ्यहीन : मुख्यमंत्री
या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने एक निवेदन जारी केले. मुख्यमंत्री गृह विभागावर नाराज नाहीत, या बातम्या तथ्यहीन आहेत, असा खुलासा त्या निवेदनात होता. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी दुपारी ३ वाजता बैठक घेतली. नंतर वळसे म्हणाले, “गृह विभागाच्या कामांत काही उणिवा राहू शकतात. त्यावर शिवसेनेला आक्षेप असू शकतो, आमच्या कामात सुधारणा करण्याला वाव आहे.’

वळसे पाटील लगेच दुसऱ्यांदा ‘वर्षा’ बंगल्यावर
सायंकाळी ६ वाजता वळसे पुन्हा ‘वर्षा’ बंगल्यावर पोचले. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. संजय राऊत, पोलिस महासंचालक रजनीश सेठ उपस्थित होते. पुरावे देऊन भाजप नेत्यांवरील कारवाया होत नाहीत, याविषयी राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी वन टू वन केसवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी वळसे आणि राऊत यांच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे कळते.

तिसरी बैठक... पुढील रणनीती ठरली
या बैठकीनंतर गृहमंत्री आणि संजय राऊत तसेच पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्यात स्वतंत्र बैठक झाली. राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रकरणावर सविस्तर चर्चा झाल्या. पुढे काय करता येईल यावर गृह विभागाने स्पष्टीकरण दिले. बैठक ८ वाजता संपली. त्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी “दिलीप वळसे पाटील हे उत्तम गृहमंत्री आहेत’ असे स्पष्टीकरण दिले.

१. भाजप नेत्यांविरुद्ध कारवाईबाबत बैठकीचे दृश्य परिणाम किमान एक ते दिड महिन्याने दिसू शकतात. २. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहमंत्रिपदाची मागणी शिवसेनेने केलेली नाही.या बैठकीत हा मुद्दा नव्हता, असे समजते.

निशाणा ‘सोमय्या’ : संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या व त्यांचा पुत्र नील यांच्या २१ भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे पुरावे दिले आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी संजय राऊत बैठकीत आग्रही राहिले.

बातम्या आणखी आहेत...