आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशन:नद्यांतील गाळ काढण्याबाबत धोरण आखणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधिमंडळात महत्त्वाचे निर्णय जाहीर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिपळूणच्या धर्तीवर राज्यातील सर्व नद्यांमधील गाळ काढणे, रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात धोरण आखण्यात येणार असून यासंदर्भातील कारवाई युद्धपातळीवर करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (२३ ऑगस्ट) सांगितले.

विधानसभेत बुधवारी चिपळूण येथील वशिष्ठी नदीला आलेल्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासंदर्भात भाजप आमदार सुनील राणे यांनी प्रश्न उपस्थित केला, यास उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, रवींद्र वायकर, अशोक चव्हाण, भास्कर जाधव, नितेश राणे, भरत गोगावले यांनी सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री म्हणाले, या वर्षी नदीतून गाळ काढण्याचे काम झाल्याने गतवर्षींच्या तुलनेत या वर्षी चिपळूणमध्ये पाणी शिरले नाही. चिपळूणच्या धर्तीवर राज्यातील सर्व नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण आणि गाळ काढण्याबाबत धोरण आखणार, याबाबत युद्धपातळीवर काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, जून महिन्यात वाशिष्ठ व शिवनदीतून एकूण ८.१० लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आला.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला कचरा व ढिगारे उचलणे, मदत छावण्या, शेतीपिके व मालमत्तेच्या नुकसानीसाठी राज्य प्रतिसाद निधीच्या दराने ५१ कोटी ८० लाख इतका निधी गाळ काढण्यासाठी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी १० कोटी २८ लाख ५६ हजार निधी प्राप्त झाला आहे. ५५ टक्के निधी खर्च करून नदीतील गाळ काढण्यात आला आहे. उस्मानाबाद विद्युत अपघात चौकशीतील दोषींवर कारवाई उस्मानाबादेतील मौजे सकनेवाडी शिवारात उच्चदाब वाहिनीच्या विद्युत खांबाचा ताण तुटून खांब पडल्याची घटना घडली. यासंदर्भात तत्काळ विद्युत कंपनीच्या कामाची वस्तुस्थिती तपासून कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. मौजे सकनेवाडी येथे उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत ११ केव्ही वीजवाहिनी व १० केव्ही रोहित्र उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. येथे विद्युत खांबाचा ताण तुटून २ खांब पडले होते.

मराठवाड्यातील फीडर सेपरेशनच्या कामाला प्राधान्य महावितरण कंपनीमार्फत लातूर जिल्ह्यात सिंगल फेज रोहित्र दुरुस्त करून अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाईल. मराठवाड्यातील फीडर सेपरेशनचे काम प्राधान्याने ठराविक कालावधीत पूर्ण करण्यात येईल. लातूर मंडळातील ६९७ सिंगल फेज रोहित्र तसेच ६२७ थ्री फेज रोहित्राचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच १५२ सिंगल फेज व १५८ थ्री फेज रोहित्र बदलण्याचे काम सुरू आहे.

श्रीरामपूर घटनेतील पोलिसांची चौकशी श्रीरामपूर तालुक्यातील घटनेतील पोलिस अधिकारी संजय सानप यांची विभागीय चौकशी केली जाईल. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलिस अधिकारी संजय सानप यांना निलंबित केले. त्यांचे या घटनेतील इम्रान कुरेशी यांच्याशी काही संबंध आहेत का? याची चौकशी केली जाईल.

बदली आदेश, पुणे पोलिस अधीक्षकांना समज चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना समज देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले की, त्या पोलिस अधीक्षकांना समज दिली आहे. त्यांनी संबंधित महिला पोलिस कर्मचारी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. लिपिकावर ठपका ठेवण्यात आला आहे.

रडार यंत्रणा हलवण्याबाबत एकत्रित बैठक घेणार मुंबई शहरातील जुहू व दहिसर येथे असलेल्या भारतीय विमान प्राधिकरणाच्या रडार यंत्रणा गोराई परिसरात हलवण्याबाबत विचार सुरू असून याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. लातूर विमानतळाच्या विकासाबाबत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेतली जाईल आणि तोडगा काढला जाईल असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

रुग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित राज्यात रुग्णालयांतील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या समस्या सोडवण्यासाठी रुग्णालय सल्लागार समिती गठित केली जाईल. विधान भवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सुभाष देशमुख या शेतकऱ्याच्या उपचारात कसूर होणार नाही, त्यांचे प्राण वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...