आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन ही घोषणा केली आहे.
उदय सामंत यांनी केली होती मागणी
एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यानूसार शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदुत्वावर भर
उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी हिंदुत्वावरुन शिंदे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदुत्वावर आपला दावा भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्व 40 आमदारांनी नुकताच अयोध्येचा दौरा केला. या दौऱ्यातही एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वावरुन उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. हनुमान चालिसा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना तुरुंगात टाकणारे उद्धव ठाकरे हेच रावण आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली होती.
राज्यभरात सावरकर गौरव यात्रा
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हटल्याच्या प्रकरणावरुनही शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडात मारली होती. त्या प्रमाणे उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली होती. त्यात शिंदे यांनी राहुल गांधी याचा धिक्कार करत असल्याचे म्हटले होते. तसेच, सावरकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिंदे गट व भाजपतर्फे राज्यभरात ठिकठिकाणी सावरकर गौरव यात्राही झाल्या. आता शिंदे सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा घेतलेला हा निर्णय त्याचेच पुढचे पाऊल मानले जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.