आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना कर्जासाठी सिबिलची अट नको:मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सर्व बँकांना सूचना

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे. बँकांनी त्यांना सिबिल स्कोअरचे निकष लावू नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार प्रयत्न करत असून बँकांनी या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी बँकांना केली.

नाबार्डच्या वतीने सोमवारी येथील सह्याद्री अतिथीगृहात स्टेट क्रेडिट सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नाबार्डच्या २०२३-२४ च्या स्टेट फोकस पेपरचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टेट फोकस पेपरमध्ये विविध प्राधान्य क्षेत्रांसाठी ६ लाख ३४ हजार ५८ कोटी रुपयांच्या क्रेडिट क्षमतेचा आराखडा देण्यात आला आहे. २०२१-२२ या कालावधीच्या तुलनेत या आराखड्यात ४७ टक्के वाढ झाल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीकडे पुढे नेत आहोत. त्यादृष्टीने हा स्टेट फोकस पेपर उपयुक्त ठरेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्याच्या सर्व कर्ज गरजा बँकिंग प्रणालीतून पूर्ण केल्या जातील याची काळजी घेतल्यास तो आत्मविश्वासाने पायावर उभा राहील आणि आत्महत्यांचा विचार सुद्धा त्याच्या मनात येणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील कृषी, ग्रामीण पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि इतर क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग तसेच बँकर्स यांचा सहभाग आणि समन्वय असेल तर योग्य दिशेने विकास होऊ शकेल, असेही शिंदे यांनी या वेळी बोलताना सांगितले.