आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:मुख्यमंत्री ठाकरेंचे चालते, आमचा स्वबळाचा नारा त्रासदायक ठरतो, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आघाडी सरकारमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर

निवडणुकीच्या तयारीला लागा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना वारंवार आदेश देत असतात. ते बोलत असतील तर चालते, मग काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यास ताे त्रासदायक का ठरतो, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आघाडी सरकारला पुन्हा एकदा घराचा आहेर दिला.

लोणावळा (जि. पुणे) येथे पटोले पक्षाच्या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. या वेळी त्यांनी आघाडी सरकारमधील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. पटोले म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची नुकतीच बैठक घेतली. त्यात त्यांनी “युती किंवा आघाडीची चिंता करू नका, निवडणुकाच्या तयारीला लागा’ असे सांगितले. त्यावर कुणी तक्रार केली नाही, पण काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला की त्यावर आघाडीत लगेच बोट ठेवले जाते. काहींना आमच्या स्वबळाच्या नाऱ्याचा त्रास होतो असे का,’ असा सवालही त्यांनी केला. पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे हे चुकीचे बोलतात असे मी म्हणणार नाही. काँग्रेस म्हणून आम्हाला तसाच अधिकार आहे, असे पटोले म्हणाले. आता यावरूनही राजकासरण पेटण्याची शक्यता आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे अजित पवार करत नाहीत
अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते पुण्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काहीच कामे करत नाहीत. आमचे संपर्कमंत्री शिफारस करतात, पण आमची कामे होत नाहीत, अशी तक्रार पटोले यांनी कथन केली. काँग्रेसची कामे होत नसल्याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहोत. काँग्रेस पक्ष मागणारा नाही, तर देणारा आहे. आमच्या काही चुकांमुळे सध्याची पक्षावर परिस्थिती ओढवली आहे, असे पटोले यांनी कबूल केले.

चंद्रकांत पाटील यांना ‘चंपा’ म्हणणार नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘महाराष्ट्राचे पप्पू’ म्हणून माजी हेटाळणी केल्याचे समजले. पण मी चंद्रकांत पाटील यांना ‘चंपा’ किंवा फडणवीसांना ‘टरबुज्या’ असे कधीही म्हणणार नाही, असे पटोले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘जागतिक पप्पू’ म्हटले जाते. पण कोणी कुणाला पप्पू म्हटले म्हणून तसे हाेत नसते, असे पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...