आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढत चालला आहे. राणे यांनी विमानतळ उद्घाटनास मुख्यमंत्र्यांची गरज काय, असा सवाल केला होता. त्यावर शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विमानतळ राज्य सरकारचे असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित असतील, असे बुधवारी स्पष्ट केले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राणे आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी देसाई म्हणाले, उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने विमानतळ प्रकल्प हाती घेऊन काम पूर्ण केले. एकूण २८६ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली असून ५२० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. विमान पत्तन प्राधिकरण नागर विमानन महानिदेशालय यांच्यातर्फे लागणारे सर्व परवाने आता प्राप्त झाले आहेत.
या वेळी नारायण राणे यांचे नाव घेण्याचे देसाई यांनी टाळले. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून या कार्यक्रमास उपस्थित असतील. शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोण केंद्रीय मंत्री उपस्थित असणार आहे याची माहिती नाही, असे देसाई यांनी सांगितले. विमानतळ उद्योग विभागाचा आहे. त्यामुळे त्याचा मंत्री म्हणून मी स्वागताला असेन, असे देसाई यांनी या वेळी सांगतिले.
मुख्यमंत्र्यांची गरज नाही : राणेंचा दावा
नारायण राणे यांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विमानतळ उद्घाटनाची तारीख जाहीर केली होती. तसेच मुख्यमंत्री या कार्यक्रमास असण्याची गरज नाही, असा दावा त्यांनी केला होता. सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राणे यांचे दावे खोडून काढले. राणे आता मंत्री झालेत, मी गेली ७ वर्षे विमानतळाचा पाठपुरावा करत असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा अवमानकारक उल्लेख केल्याबद्दल राणे यांना नुकतीच अटक झाली होती. त्यानंतर नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विमानतळ उद्घाटनप्रसंगी एका व्यासपीठावर प्रथमच येत आहेत. त्यामुळे येथे आता वादाची ठिणगी पडते का, हे पाहावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.