आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे अहमदनगरचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली.
काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती, कोरोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत असतांनाच अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली हा मोठा आघात आमच्या शिवसेना परिवारावर तर आहेच पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे.
युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले अनिल भैया राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरून लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात अक्षरश: रुजविली. लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली. नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आणि ते यशस्वी करून दाखवले. नगर जिल्ह्यातून २५ वर्षे सतत आमदार म्हणून निवडून येत असले तरी रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता अशी ओळख सांगण्यात त्यांना अभिमान होता, कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे असे समजणाऱ्या अनिल भैया यांच्या जाण्याने शिवसेनेतील आमच्या अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक आम्ही गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.