आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:महाराष्ट्राचे साहित्य 'रत्न' निखळले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सांस्कृतिकविश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्वं हरपलं- अजित पवार

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे.  ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते.  त्यांनी त्यांच्या साहित्यातून,  नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला. आमच्या पिढीतल्या लहानांचे भाव विश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केले. एकीकडे अनेक मानाचे पुरस्कार मिळत असतांनाही  रत्नाकर मतकरी हे रसिकांना निखळ आनंद देण्यासाठी सच्चेपणाने नवनवीन साहित्य लिहीत गेले. त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. महाराष्ट्राचे साहित्य'रत्न' आज निखळले. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना वाहिली श्रद्धांजली.

सांस्कृतिकविश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्वं हरपलं- अजित पवार

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्वं हरपलं असून साहित्यिक, रंगभूमी, सांस्कृतिक क्षेत्रातलं रत्नाकर मतकरी यांचं योगदान चिरंतन राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. रत्नाकर मतकरी हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेलं नाव आहे. महाराष्ट्रातील आबालवृद्धांसाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केली. कथा, गुढकथा, कादंबरी, एकांकिका, नाटकं अशा साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. रंगभूमीवर यशस्वी नाटककार, दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. चित्रपट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला होता. अनेक मान,  सन्मान, पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या रत्नाकर मतकरी यांना मराठी साहित्य,  कलारसिकांनीही नेहमीच भरभरुन प्रेम, आदर, सन्मान दिला. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या साहित्य, कला विश्वाची मोठी हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

रत्नाकर मतकरींच्या निधनाने महाराष्ट्राने बहुआयामी ‘रत्न’ गमावले! -बाळासाहेब थोरात

ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक बहुआयामी ‘रत्न’ गमावले आहे. त्यांच्या निधनाने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

मतकरी हे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकारही होते. त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गुढकथा, कादंबरी, ललीत लेख, अशा साहित्य प्रकारात दर्जेदार लेखन केले. ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, अशा अनेक नाटकांमधून त्यांनी रसिकांच्या मनात घर केले. बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून अनेक बालनाट्यांची निर्मितीही केली. 'अलबत्या गलबत्या' आणि 'निम्मा, शिम्मा राक्षस' तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारित 'आरण्यक' ही नाटके रंगभूमीवर गाजली.वयाच्या सतराव्या वर्षी ‘वेडी माणसं’ या एकांकिकेपासून लेखनास सुरुवात केली ती शेवटपर्यंत अव्याहतपणे सुरुच होती. मतकरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन मतकरी यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे एका चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो- अमित देशमुख

"

बाल नाट्य ते भयकथा असा विस्तृत पट आपल्या लेखणीतून  साकारणारे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक,चित्रकार, आस्वादक, विज्ञानवादी रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे, एका चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र मुकला आहे", अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

" मतकरी यांच्या रंगभूमीवरील बहुमूल्य योगदानाचा गौरव, राज्य शासनाच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराने करण्यासाठी, मार्च महिन्यात निवड समितीने शिफारस केली होती, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू झाल्याने पुरस्काराची घोषणा आणि  प्रदान समारंभ होण्यापूर्वीच मतकरी आपल्याला सोडून गेले, यांचे अतीव दुःख आहे. त्यांचे साहित्य,नाट्य क्षेत्रातील योगदान तसेच त्यांचे पुरोगामीत्व रसिकांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने साहित्य आणि रंगभूमी  क्षेत्रात भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे ", असेही देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...