आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशेष मुलाखत:एकाधिकारशाही आवडणाऱ्यांना लोकशाहीचे मोल कसे समजणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल

मुंबई2 महिन्यांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

"देशातील सरकारमुळे एकाधिकारशाहीची सवय लोकांना लागली आहे. त्यामुळे, माझी आणि या सरकारची ‘लोकशाही शैली' काही जणांना खटकत असावी,’ अशी टिप्पणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्याच वेळी, ‘भाषावार प्रांतरचना मोडून भाजपने या देशात “पक्षवार प्रांतरचना' सुरू केली आहे,' असे टीकास्त्रही सोडले. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तारूढ झाले, त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी खास “दिव्य मराठी'ला मुलाखत दिली.

‘आपले सरकार कार्यकाळ पूर्ण करेल,' याची ग्वाही देतानाच, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. सरकारमध्ये अंतर्विरोध आहेत, हा मुद्दा फेटाळून लावत, आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. "तीन पक्षांची वेगवेगळी मते असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सरकारमध्ये बेबनाव आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. विधाने वेगवेगळी असू शकतात, पण धोरणात्मक पातळीवर समन्वयाचा अभाव नाही. लोकशाहीत वेगळी मते असणारच. पण, सध्या लोकांना एकाधिकारशाहीची सवय झाल्याने लोकशाही असणे म्हणजे समन्वय नसणे असे काहींना वाटते,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वीज बिलांबद्दल बोलताना, “वाढीव वीज बिल' या शब्दप्रयोगाबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. कोरोनाच्या कालावधीत तीन महिन्यांची बिलं एकदम आली. त्यातून हा आकडा मोठा वाटतो. अर्थात, जिथे सदोष मीटर रीडिंग झाले आहे, त्याची योग्य ती तपासणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “वीज कंपन्यांकडे साठ हजार कोटींची थकबाकी आहे, त्याचे काय? मुख्य म्हणजे, आम्हाला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षनेते काहीही आरोप करत असले, तरी त्यांच्या काळातील पाप आमच्या माथी ते मारत आहेत,' असेही ठाकरे यांनी सांगितले. ‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार प्रयत्नशील आहे. मदतही केली जात आहे. मात्र केंद्राकडे आमचे ३८ हजार कोटी बाकी आहेत. ती रक्कम आल्याशिवाय आम्ही पुढे काय करणार?' अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ‘आपल्या देशात भाषावार प्रांतरचना आहे. मात्र, केंद्र सरकारने पक्षवार प्रांतरचना केली आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय, असे चित्र आहे.' ‘अर्थात, या संकटातही आपण पुढे जात आहोत. बाहेरून गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग पूर्ण होत आहेत. विकासाच्या दिशेने आपण चाललो आहोत,' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘हिंदुत्व आमच्या धमण्यांमध्ये आहे', असे सांगताना ठाकरे म्हणाले, “घंटा बडवणारे आमचे हिंदुत्व नाही. आमचे हिंदुत्व प्रबोधनकारांचे आहे. ते दांभिक आणि फसवे नाही. त्यामुळे, आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये. आणि, अशा लोकांना आम्ही भीक घालत नाही. मुळात, आता लोकच आमच्यासोबत असल्यामुळे या सरकारला कसलीही चिंता नाही.'

मी भाषण करत नाही, बोलतो!
मुख्यमंत्र्यांचा जनतेशी होणारा संवाद यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी भाषण करत नाही. बोलतो. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सांगत असत : भाषण ठोकू नका. बोला. तुम्ही संवाद करता, तेव्हा तो लोकांच्या हृदयाला भिडतो. माझे आजोबा, माझे वडील तेच करत. माझ्या वडिलांना वक्ते म्हणून तीन लोक आवडत. अर्थातच माझे आजोबा, कॉम्रेड डांगे आणि आचार्य अत्रे. माझी शैली विकसित करण्यात त्यांच्यासोबतच पु.ल.देशपांडे यांच्या साहित्याचा, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानांचा मोठा वाटा आहे. मला भाषण करता येत नाही, असे पूर्वी लोक म्हणत. आज मात्र तेच लोकांना आवडत आहे. मला वाटते, या अनौपचारिक संवादातून नाते तयार होते.. आणि, असेच नाते मला माझ्या महाराष्ट्रासोबत विकसित करायचे आहे.

न्यायालयांची चपराक हेच कामगिरीचे मूल्यमापन - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
एकाच दिवशी दोन न्यायालयांचे निकाल एक प्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा आवाज अशा प्रकारे चिरडून टाकणे म्हणजे सरकार चालवणे नाही. पोलिस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाही, हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सद‌्सद‌्विवेक बुद्धी-संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का, हा प्रश्न निर्माण होतो.

जनसामान्यांच्या वेदनेचा विसर पडलेलं सरकार - प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
अवतीभवती प्रश्नांचा ढिगारा असताना राज्य सरकार काहीही करताना दिसत नाही. मागील पंचवार्षिक याेजनेत देवेंद्र फडणवीसांनी केलेली कामे लाेकांच्या स्मरणात आहेत. त्यामुळे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वंचितांना न्याय मिळाला. ठाकरे सरकार जनसामान्यांमध्ये दिसतच नाही. लाेकांपासून दूर राहणारं सरकार लाेकांच्या समस्या काय साेडवणार? या सरकारची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. वर्षभराच्या सरकारच्या कामाला मी १०० पैकी ३० मार्कही देणार नाही, इतकं सगळं वाईट चाललं आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser