आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून ठाकरे सरकार विरुद्ध केंद्रातील मोदी सरकार यांच्यात सामना सुरू आहे. केंद्राने कांजूर मार्गमधील कारशेडच्या जमिनीवर आपला हक्क सांगितला आहे. त्यानंतर ठाकरे सरकारनेही जालीम हत्यार उपसले आहे. तुम्ही मेट्रो कारशेड रोखणार असाल तर आम्ही बुलेट ट्रेन, वाढवण बंदर या पंतप्रधानांच्या प्रकल्पांना सुरुंग लावू, असा अप्रत्यक्षरीत्या इशारा दिला आहे. प्रस्तावित मेट्रो कारशेड आरेमधून कांजूर मार्गला हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रियाही झाली होती. मात्र, ही जमीन आपली असल्याचा केंद्राने दावा केला. वाद न्यायालयात गेला आणि कामावर स्थगिती आली. त्याचा वचपा काढण्यासाठी बुलेट ट्रेनसाठी राखून ठेवलेली बीकेसीतील जमीन मेट्रो कारशेडसाठी वापरण्याची चाचपणी राज्य सरकारने चालवली आहे.
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हा पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. बीकेसीत (वांद्रे) बुलेट ट्रेनचा शेवटचा थांबा असणार आहे. त्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने जमीन राखून ठेवली होती. अद्याप ती बुलेट ट्रेनच्या कंपनीला हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे या जमिनीवर मेट्रो कारशेड करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
कांजूर मार्गला कारशेडसाठी २९ हेक्टर जमीन उपलब्ध होती, बीकेसीत २४ हेक्टर आहे. सरकार बीकेसीतील जमिनीची कारशेडसाठी पाहणी करत आहे, असे नगरविकास मंत्री व सेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भाजपच्या अॅड. आशिष शेलार यांनी बुलेट ट्रेनमध्ये ठाकरे सरकार खोडा घालण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे. मेट्रो कारशेडच्या कामात केंद्राने खोडा घातल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी प्रस्तावित वाढवण बंदरच्या (जि. पालघर) विरोधकांशी वर्षा निवासस्थानी चर्चा केली. मेट्रो अडवाल तर आम्ही तुमचे वाढवण होऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी बैठकीतून दिल्याचे मानले जाते आहे. एकूणच मेट्रो कारशेडच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत मोठे घमासान सुरू असल्याचे दिसत आहे.
खड्ड्यात घालणारे सल्ले : फडणवीस
बुलेट ट्रेन स्टेशनची बीकेसीतील जागा मेट्रो कारशेडसाठी देण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. हा पोरखेळ आहे. बीकेसीची जागा १८०० कोटी रुपये प्रतिहेक्टर आहे. २५ हेक्टर जागेसाठी ३० हजार कोटी खर्च येईल. बुलेट ट्रेनचे स्टेशन जमिनीखाली असेल. मेट्रो कारशेड जमिनीखाली नेल्यास ५०० कोटींचा खर्च ५००० कोटींवर जाईल. एकूण राज्याला खड्ड्यात घालणारे सल्ले मुख्यमंत्र्यांना कुणी तरी देत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.