आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजप युवती आघाडीची कार्यकर्ती पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी माैन सोडले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. तसे होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीतून जे सत्य जनतेसमोर येईल त्यानंतर कारवाई केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शनिवारी राष्ट्रीय महिला आयाेगाने याची दखल घेतली. राज्याचे पोलिस महासंचालक आणि पूणे पूर्व विभाग पोलिस आयुक्तांना याप्रकरणी बारकाईने तपास करण्याची मागणी आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली आहे.
भाजपने खेचले शिवसेनाप्रमुखांना
शिवसेनाप्रमुखांचा हवाला देऊन भाजपने त्यांनाही या प्रकरणात खेचले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे महिला सुरक्षेला प्राधान्य देऊन बोलत होते. त्यांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरे यांनी चौकशी करून पीडितेच्या कुटुंबास न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
नातेवाइकांची अद्याप तक्रार नाही : पूजाचा मृतदेह घेऊन नातेवाईक मूळ गावी गेले आहेत. सध्या तरी त्यांनी कोणतीच तक्रार दिली नाही. त्यांची काही तक्रार असल्यास त्याची दखल घेतली जाईल, असे पोलिस उपायुक्त विभाग ५ च्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.
ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा तरुणही गायब; घरचा फोनही बंद
परळी | भाजप बंजारा युवती आघाडीची कार्यकर्ता पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिचे परळी शहरातील घर बंद आहे. तर, आई-वडील संपर्काबाहेर आहेत. या घटनेतील ऑडिओ क्लिप माध्यमात आणणारा राठोड नावाचा तरुणही गायब असल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. परळी तालुक्यातील वसंतनगर येथील मूळ रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण हिने ६ फेब्रुवारी रोजी रात्री पुणे येथे आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप मागील चार दिवसांपासून समाज माध्यमात व्हायरल झाल्या आहेत. यानंतर राज्यभर प्रकरण गाजत आहे. भाजप बंजारा युवती आघाडीची व माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांची कार्यकर्ती असलेल्या पूजा हिच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून माध्यमांत आलेल्या क्लिपवरून विदर्भातील मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मुंडे भगिनी, चित्रा वाघ यांनी केल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. दुसरीकडे पूजाच्या आत्महत्येबाबत तिच्या आई-वडिलांनी अद्याप तरी पोलिसांत कसलीच तक्रार दिलेली नाही. घटना घडल्यापासून सर्व कुटुंबीय माध्यमांपासून दूर आहेत. वडिलांचा फोनही बंद आहे. पूजा राहत असलेले परळी शहरातील नेहरू चौक भागातील घरही बंद आहे. या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या राठोड नावाच्या तरुणाचाही ठावठिकाणा नाही. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
वडिलांना सुरू करून दिला व्यवसाय
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली पूजा चव्हाण ही भाजप बंजारा आघाडीची कार्यकर्ती होती. कमी काळात ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पूजाने तिच्या वडिलांना कुक्कुटपालनाचा व्यवसायही सुरू करून दिला होता.
समाजात दोन प्रवाह : या प्रकरणात एका मंत्र्याचे नाव समाेर आल्यानंतर बंजारा समाजात दोन मतप्रवाह सुरू झाले आहेत. पूजाला न्याय मिळावा या बाजूने काही संघटना, राजकीय पक्ष आक्रमक आहेत, तर काही बंजारा संघटनांकडून मंत्र्याचे समर्थन करत त्यांना विनाकारण यात गोवले जात असल्याचे म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.