आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक भान जर राखले जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये सावित्रीमाईंना स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा लेकी अभिप्रेत होत्या का?, असा सवाल करत उर्फी जावेदची बाजू घेत फोटो पोस्ट करणाऱ्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तर दुसरीकडे महिलांच्या वेशभूषेवरून राजकारण सुरू आहे. यावर रोज काही ना काही घडत आहे.
अंधारेंचे वक्तव्य काय?
उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. सुषमा अंधारे यांनी काही फोटो पोस्ट करत एक प्रतिक्रिया लिहिली होती. त्यात त्या म्हणाल्या होत्या की, जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना रनोट किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल, असा सवाल त्यांनी केला होता.
हे सामाजिक भान
चित्रा वाघ यांनी पाच ट्विट करत सुषमा अंधारे यांना उत्तर दिले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल, तर तो झाला कामाचा भाग. यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो,सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणे हे सामाजिक भान आहे.
असे आदर्श असावेत?
चित्रा वाघ पुढे म्हणतात की, सामाजिक भान जर राखले जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान न राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणे, हा ही धर्म नाही का ? लेकी - बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का ?, असा सवालही त्यांनी केला.
समाजस्वास्थ्य महत्त्वाचे
चित्रा वाघ पुढे म्हणतात की, स्री शिक्षित व्हावी,सक्षम व्हावी,यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा लेकी अभिप्रेत होत्या का ? जिथे समाजस्वास्थ्य महत्त्वाचे, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का ?, असा सवाल करत त्यांनी सुषमा अंधारे यांचे नाव न घेता त्यांना टोला मारला आहे.
उपदव्याप रोखणार
चित्रा वाघ पुढे म्हणतात की, माझे आवाहन आहे की, हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या. छत्रपतींचा आदर्श, सावित्रीचे संस्कार जपू या. खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या. हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही, तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे, ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का?, असा सवालही त्यांनी केला आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच. समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.