आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:‘पेनड्राइव्ह’ प्रकरणाचा होणार सीआयडी तपास; फडणवीसांनी विधानसभेत दिला दुसरा पेनड्राइव्ह

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार गिरीश महाजन तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांना खाेट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट सरकार व सत्ताधारी नेते रचत असल्याचा आरोप फेटाळून लावत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ‘पेनड्राइव्ह’ प्रकरणी राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) तपास करेल, अशी घाेषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली. महाजन यांच्यावरील गुन्ह्याच्या खटल्यातील सरकारी वकील आणि फडणवीस यांच्या स्टिंग ऑपरेशनमधील ज्यांचे संभाषण आहे ते सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी वकीलपत्र मागे घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. फडणवीस यांनी हा आरोप करताना ८ मार्च रोजी त्यासंदर्भातील संभाषण रेकाॅर्ड असलेला पेनड्राइव्ह सादर केला होता. गृहमंत्री वळसे पाटील यांनी आरोपाला सोमवारी उत्तर दिले. दुसरीकडे, फडणवीस यांनी दुसरा पेनड्राइव्हही सादर केला.

केंद्रीय यंत्रणांची कारवाई प्रवक्त्याच्या माहितीवर
गृहमंत्री वळसे पाटील यांनी काही प्रकरणांचे दाखले देत तुमचाही न्यायालयावरील विश्वास वाढला असा भाजपकडे निर्देश करताच सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवली. मुंबईत प्रवक्ता माहिती देताे आणि दुसऱ्या दिवशी केंद्रीय यंत्रणा कारवाई करतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. तपास यंत्रणांचा वापर कोण आणि कसा करताे हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही, अशी टिप्पणी वळसे यांनी केली.

देवेंद्र फडणवीस सीबीआय चाैकशीवर ठाम
वळसे पाटील यांनी दिलेल्या उत्तरावर बाेलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘गृहमंत्री इतके हतबल झालेले कधीही पाहिले नाही,’ असे म्हणत याप्रकरणी सीबीआय चाैकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केली. सरकार एेकत नसेल तर न्यायालयात जावे लागेल, असे सांगून त्यांनी सभात्याग केला. भाजपचे सर्व आमदारही सभागृहाबाहेर पडले.

फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी उघडली का? : वळसे
वळसे पाटील म्हणाले की, फडणवीस हे एकीकडे महाराष्ट्र पाेलिसांचे काैतुक करतात आणि दुसरीकडे सीबीआय चाैकशीची मागणी करतात. महाजन प्रकरणात बनावट केस केली या खाेलात मी आताच जाणार नाही, तपासातून सर्व बाहेर येईल. फडणवीस नेहमी पेनड्राइव्ह देत असतात. त्यांनी डिटेक्टिव्ह एजन्सी उघडली की काय, असा प्रश्न पडताे. या पेनड्राइव्हचा तपास करावा लागेल. तपासातून जे पुढे येईल त्यावर कारवाई करावी लागेल. गिरीश महाजन प्रकरणात तपासासाठी फडणवीस यांनी दिलेला पेनड्राइव्ह उपयाेगी पडणार आहे, असेही वळसे म्हणाले.

बिहारमध्ये गुन्हा नोंदवून केंद्रीय यंत्रणांचा तपास
घटना जळगावमधील आणि गुन्हा पुण्यात नोंद झाला, या आरोपाला उत्तर देताना वळसे म्हणाले, सुशांतसिंग राजपूत प्रकरण मुंबईत घडले, पण त्याचा गुन्हा बिहारमध्ये नोंदवला गेला आणि केंद्रीय यंत्रणांनी तपास सुरू केला. नवाब मलिक केंद्रावर टीका करत होते म्हणून त्यांना १९९३ च्या बाॅम्बस्फाेट प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न चालला आहे, असे वळसे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...