आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनिश्चिततेचे सावट होते. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात माहिती दिली असून ३० लाख परीक्षार्थींचा जीव भांड्यात पडला आहे. यंदा इयत्ता बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर होईल, तर दहावीची परीक्षा १ मेनंतर होऊ शकते, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. गायकवाड यांनी यापूर्वी १२ वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर सरकारचा विचार सुरू असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीची परीक्षा होते, तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत असते.
औरंगाबाद, पुणे, नाशकात 9 ते 12वी शाळांची आज वाजणार घंटा
औरंगाबाद | औरंगाबाद शहर, नाशिक आणि पुणे येथे सोमवार (दि.४) पासून नववी ते बारावी शाळांची घंटा वाजणार आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत पहिल्या दिवशी पुण्यातील पन्नास ते साठ शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालकांची लेखी संमती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना निगेटिव्ह अहवाल आलेल्या शिक्षकांनाच शाळेत प्रवेश दिला जाईल.
विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी लांबणीवर
- यंदा कोरोना संसर्गामुळे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी यंदा परीक्षा उशिराने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या सुमारे ३० लाख परीक्षार्थींना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
- दहावी, बारावीच्या परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे या परीक्षाही लांबणीवर पडणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे २०२१ पूर्वी होणार नाहीत, असे शिक्षणमंत्र्यांनी मध्यंतरी स्पष्ट केले होते.
५ ते ८ वर्गांबाबत यथावकाश निर्णय : कोरोना रुग्ण घटत असले तरी ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराच्या संसर्गाची राज्यात भीती आहे. त्यासंदर्भातली स्थिती पाहून पाहून ५ ते ८ वीचे वर्ग केव्हा सुरू करायचे याचा निर्णय घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. दरम्यान, सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ४ ते १५ जुलैदरम्यान या परीक्षा होत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.