आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे रात्री दोन वाजेपर्यंत लोकांना भेटणारा, कायम जाहीर कार्यक्रमात रमणारा नेता, परंतु राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणीची तारीख जवळ आल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाचा राबता कमी झाला आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच शिवसेनेचे ९ मंत्री आता मंत्रालयात दिसत नसून शिवसेनेचे आक्रमक प्रवक्ते आता थंड झाले आहेत. विशेष म्हणजे बहुतांश कार्यक्रमात शिंदेंसोबत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्वचितच एखाद्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत दिसतात. त्याविषयी उलटसुलट चर्चा होत आहे.
मुख्यमंत्र्यांचा कारभार मुंबईतील वर्षा, नंदनवन तसेच ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानातून चालतो. बैठका मलबार हिलच्या सह्याद्री अतिथीगृहात आणि मंत्रिमंडळ बैठकीवेळी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील सीएमओमध्ये मुख्यमंत्री काम करायचे. दिवसभराच्या सरकारी बैठका, सायंकाळचे जाहीर कार्यक्रम आणि रात्री पक्षप्रवेशाचे सोहळे असा पहाटे दोन वाजेपर्यंत त्यांचा व्यस्त दिनक्रम होता. गेले ९ महिने असाच दिनक्रम आहे. गणेशोत्सवात तर त्यांनी २४ तासांत ५०० पेक्षा अधिक गणेश मूर्तींचे दर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून आवर्जून कळवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या कामकाज पत्रिकेतील कार्यक्रम आता कमी दिसतात. त्यातही आमदारांच्या मतदारासंघातील बैठकासारखे अगदी क्षुल्लक असतात. मंत्रिमंडळ बैठकीतील प्रस्ताव गौण असतात. दर आठवड्याला मंत्रिमंडळ बैठक होत नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांकडे विचारणा केली असता, खारघर उष्माघात दुर्घटनेनंतर साहेबांनी जाहीर कार्यक्रम कमी केले असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेचे ९ कॅबिनेट मंत्री आहेत. सर्व आघाड्यांवर प्रवक्ते नेमलेले होते. उद्धव गटाकडून नुसते चू झाले की शिंदे गटाची फौज लागलीच तुटून पडत असे.
गेल्या दहा दिवसांत शिंदे गटात कमालीची शांतता आहे. मुख्यमंत्री बॅकफूटवर आले आहेत. मंत्री दिसेनासे झाले आहेत आणि प्रवक्ते माध्यमांच्या संपर्कात नाहीत. शिवसेनेचा आक्रमक गट एकदम कोशात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सातारा गावातील दौऱ्यानंतर सारे बंद
१. मंत्रालयासमोर शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे बाळासाहेब भवन आहे, तेथे आता पूर्ण शुकशुकाट असतो. प्रवक्ते आता ठाकरे गटाच्या दाव्यांना प्रत्युत्तरे देताना दिसत नाहीत.
२. शिवसेनेच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषदा घेणे आता थांबवले आहे.
३. खारघर उष्माघात प्रकरण १८ एप्रिल रोजी घडले, त्यानंतर मुख्यमंत्री ३ दिवस सातारा जिल्ह्यातील मूळ गावी गेले. तेव्हापासून त्यांचा एकही जाहीर कार्यक्रम झाला नाही, असे स्पष्ट दिसते.
मंत्र्यासोबतच्या अधिकाऱ्यांची मूळ अास्थापनेत जाण्याची तयारी
सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंर्षाच्या निकालाचा शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावर काहीएक परिणाम होणार नाही, असा शिंदे गटाच्या मंत्र्यांचा दावा आहे. मात्र बदल्यांचे कामे उरकुन घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. ८ मे रोजी सत्तासंघर्षाचा निकाल येणे अपेक्षीत आहे. त्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथी घडू शकतात. सरकार गडगडले तर मंत्र्यांच्या कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी मूळ आस्थापनेत जाण्याची तयारी ठेवली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.