आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM शिंदेंचा दिल्ली दौरा एक दिवसाने वाढला:PM मोदींना भेटून वेदांता-फॉक्सकॉन, आगामी निवडणुकांवर चर्चेची शक्यता

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच, आज एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे काल रात्रीच राज्यात परतणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे दौरा एका दिवसाने वाढला.

दरम्यान, आज पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत राज्याबाहेर गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावर चर्चा होणार का? मुख्यमंत्री शिंदेंना पंतप्रधान मोदी काय आश्वासन देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिंदेंनी अचानक बैठक सोडली

काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यप्रमुखांना मार्गदर्शन केले. त्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्र सदनात बैठक घेत होते. शिंदे गटाच्या विविध राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष या बैठकीस उपस्थित होते. मात्र, बैठक सुरु असतानाच एकनाथ शिंदे अचानक बाहेर पडले. याचदरम्यान त्यांनी अमित शहांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री शिंदे-अमित शहांच्या भेटीबाबत अद्याप शिंदे किंवा भाजपकडूनही काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र, काल या दोन नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंना कसे रोखायचे?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिंदे गट व भाजपला मुंबई पालिका निवडणुकीसाठी आरपारच्या लढाईचे आव्हान दिले. तसेच, शिवसेना कुणाची? यावर येत्या 27 सप्टेंबररोजी सुप्रीम कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे. तसेच, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळेही शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अमित शहा यांच्यासोबत भेटीदरम्यानही शिंदेंनी या महत्त्वाच्या मुद्यांवरच तसेच उद्धव ठाकरेंना कसे रोखायचे? याबबतच्या रणनितीवर चर्चा केल्याची दाट शक्यता आहे.

वेदांता-फॉक्सकॉनचे काय होणार?

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा राज्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींकडे पाठपुरावा करावा, असे सातत्याने विरोधकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आज होणाऱ्या शिंदे व मोदी यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री शिंदे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदींकडे कोणती मागणी करणार? यावर मोदी काय आश्वासन देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई पालिकेसाठी पंतप्रधान मोदी मैदानात

आगामी मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना जमीन दाखवावी, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. तर, उद्धव ठाकरेंनीही आम्ही आस्मान दाखवू, असे प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे शिवसेना तसेच भाजपसाठी मुंबई पालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. पालिका निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या मोदींसोबतच्या भेटीत मुंबई पालिका निवडणुकीच्या रणनितीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिवसेना कुणाची?, लवकरच निकालाची शक्यता

शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना आपले लेखी निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर 27 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीतच सर्वोच्च न्यायालया शिवसेना कुणाची? यावर निकाल देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत सॉलिसिटर जनरल तसेच वरिष्ठ वकिलांच्याही भेटीगाठी घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...