आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • CM Eknath Shinde Sabha: Investigate The Person Who Issued The Written Order To Gather Crowd At The Chief Minister's Meeting, Demands Congress State President Nana Patole.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी:मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी लेखी आदेशाचे पत्र काढणाऱ्याची चौकशी करा

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी लेखी आदेशाचे पत्र काढणाऱ्याची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेसाठी अंगणवाडी सेविकांनी उपस्थित रहावे, असे पत्र काढण्यात आले होते.

गर्दी जमवणे दुर्दैवी

पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील सभेस गर्दी जमण्यासाठी पैसे वाटल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत व ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांनी या सभेला हजर रहावे, असे लेखी आदेश महिला व बालकल्याण विभागाने दिल्याचे समजले. हा प्रकार गंभीर असून मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी असे लेखी आदेशाचे पत्र काढण्यामागे कोण आहे याची चौकशी केली पाहिजे. सभेला गर्दी जमवण्यासाठी शिंदे यांच्यावर ही वेळ यावी हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

कृती कार्यक्रम आखा

पटोले म्हणाले, अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नसतानाच लंपी आजाराचे मोठे संकट त्याच्यावर ओढवलेले आहे. राज्यात लंपी आजाराची लागण हजारो जनावरांना झाली असून राज्य सरकारकडून त्यावर तातडीने कृती कार्यक्रम आखून तात्काळ अंमलबजवाणी करावी तसेच लंपी आजाराने ज्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना आर्थिक मदत द्यावी.

औषधे विकत घ्या

नाना पटोले म्हणाले की, राज्यातील काही भागातील जनावरांना लंपी आजाराने ग्रासले आहे. हा रोग जास्त पसरू नये यासाठी वेळीच औषधोपचार करणे व या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. लंपी आजारावर आवश्यक लसीचा साठा राज्य सरकारने ICMR कडून Lumpy Provac IND लसींचा साठा मागवावा. तसेच जनावरांना लंपीची लागण होताच उपचार करण्यासाठी लागणारी औषधे राज्य सरकारने केंद्र सरकारडून किंवा खुल्या बाजारातून विकत घ्यावीत.

सत्कारातच मग्न

पटोले म्हणाले की, लंपी आजारावर जर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही, तर राज्यातील पशुधनाला मोठा फटका बसून शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते. भविष्यातील धोका लक्षात घेता सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, परंतु राज्यातील शिंदे फडणीस सरकार गणेशोत्सवात व्यस्त होते आणि अजूनही हार - तुरे सत्कार यातच त्यांचा वेळ जात असल्याचे दिसते. सरकारने तातडीने पावले उचलून लंपी आजारापासून पशुधन वाचवण्यास प्राधान्य द्यावे.

शेतकऱ्यांना वाचवावे

पटोले म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले परंतु राज्य सरकार त्यांना भरीव आर्थिक मदत देऊ शकले नाही. सरकारने जाहीर केलेली मदतही तुटपुंजी आहे. तीही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित सरकार शेतकरी विरोधी आहे, हे दिसून आले आहे. परंतु शेतकरी जगला तरच आपण जगू. शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते म्हणून राज्य सरकारने लम्पी आजारापासून पशुधन, दुग्धव्यवसाय व शेतकरी यांना वाचवावे.

बातम्या आणखी आहेत...