आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुलै २०२० मध्ये मुंबई पोलिस दलातील १० उपायुक्तांच्या बदल्यांविषयी तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांना ‘जैसे थे’चे आदेश दिले होते असा जबाब गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीवेळी दिला.
१०० कोटी वसुलीप्रकरणी पीएमएलए न्यायालयात ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात डिसेंबर २०२१ मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून त्यात कुंटे यांचा जबाब आहे. कुंटे राज्याच्या मुख्य सचिवपदावरून निवृत्त झाल्यानंतर सध्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आहेत. जुलै २०२० मध्ये परमबीर यांनी १० पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश रद्द केले होते. या संदर्भात कुंंटे यांनी पडद्यामागील हालचालींची माहिती दिली. पोलिस बदल्यांविषयी तक्रारी असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला होता. ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यास पोलिस आयुक्तांना (परमबीर) सांगा आणि त्यांनी कारवाई केली किंवा कसे याबाबत मला कळवण्यासही पोलिस आयुक्तांना सांगा, अशा तोंडी सूचना मुख्यमंत्र्यांनी मला दिल्या होत्या, असे कुंटे यांनी जबाबात म्हटले आहे.
गृहमंत्र्यांचे आदेश टाळणे शक्य नव्हते : अनिल देशमुख पोलिस बदल्यांकरिता ‘अनधिकृत यादी’ मला देत होते आणि ते वरिष्ठ असल्यामुळे गृहमंत्र्यांना नकार देणे मला शक्य नव्हते, असेही कुंटे यांनी ईडीच्या जबाबात स्पष्ट केले आहे.
तक्रारींबद्दल कुंटे यांचे कानावर हात
पोलिस बदल्यांविषयीच्या तक्रारींचे स्वरूप काय होते याविषयी मला काहीही माहिती नाही आणि त्याचे पुढे काय झाले याचीही आपणास कल्पना नाही, असा दावा कुंटे यांनी ईडीच्या एका प्रश्नाच्या उत्तरात केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.