आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुख्यमंत्र्यांनी 5 दिवसांत घेतले 500 बाप्पांचे दर्शन; मुख्यमंत्री केवळ सणांमध्ये सक्रिय, अजित पवारांची टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्यकर्त्यांतला नेता अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ दिवसात चक्क पाचशेपेक्षा अधिक गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा विक्रम केला आहे. यातले बहुतांश बाप्पा हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातील असून मुख्यमंत्री अगदी पहाटेपर्यंत दर्शन घेत फिरत हाेते, असे मुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धी कार्यालयातून सांगण्यात आले. यावर ‘मुख्यमंत्री केवळ सणात सक्रिय होतात’ अशी विरोधक टिका करत आहेत.

पुढच्या महिन्यात मुंबई व ठाणे महापालिका निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा सिलसिला राजकीय नेत्यांचा सुरु आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी घेतली आहे. दर्शनच्या निमित्ताने राजकीय डावपेचही आखले जात आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिड दिवसाच्या २५० पेक्षा अधिक बाप्पांचे दर्शन घेतले. हे बाप्पा बहुतेक ठाणे शहरातील होते. मुख्यमंत्री दक्षिण मुंबईतल्या शासकीय वर्षा बंगल्यावर निवासाला नसतात. ते अजूनही ठाण्यातील लुईसवाडीतील त्यांच्या खाजगी निवासस्थानी राहतात. त्यामुळे रात्री १० ते पहाटे तीन पर्यंत ते गणेश दर्शन करु शकले. दिड दिवसाचे बाप्पा हे बहुतांश कार्यकर्त्यांच्या घरचे होते.

मुख्यमंत्र्यांच्या गणेश दर्शनाच्या चित्रफीती समाज माध्यमावर आहेत. या दर्शन यात्रेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टिका केली आहे. ‘मुख्यमंत्री सण आल्यावर कसे काय सक्रीय होतात, आम्ही पण दर्शन घेतो पण कॅमेरा लावत नाहीत’, असा टोला पवार यांनी लगावला.

मंडळाची चंगळ : सार्वजनिक गणेश मंडळांना आर्थिक मदत स्थानिक नेते करत असतात. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्यात दोन वर्षानंतर गणेशोत्सव होतो आहे. त्यात शिंदे गट नव्याने राजकीय मैदानात आला आहे. शिंदे गटाने मंडळांच्या मदतीची रक्कम तिप्पट-चौपट केली. परिणामी इतर राजकीय पक्षांना त्या तुलनेत रडतखडत मदत करणे भाग पडले. यात सार्वजनिक मंडळांची आणि कार्यकत्यांची मात्र चंगळ झाली आहे.

दर्शनाबरोबर डावपेच

नारायण राणे, मुकेश अंबानी, राज ठाकरे, मिलिंद नार्वेकर, आशिष कुलकर्णी, मनोहर जोशी या बड्या नेत्यांच्या घरगुती बाप्पांचे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले.

बातम्या आणखी आहेत...