आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकाही मंत्र्याचा ब्र नाही:राठाेड थेट कॅबिनेटला, मंत्रिमंडळ गप्प; वरिष्ठ मंत्र्यांची ‘वर्षा’वर बैठक, मुख्यमंत्र्यांकडून राठोड यांची खरडपट्टी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यपाल अभिभाषण, कोरोना उपाययोजनांवर बैठकीत चर्चा

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संशयाच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेना नेते व राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी तब्बल १७ दिवसांनंतर बुधवारी शासकीय कामकाजात भाग घेतला. राठोड हे बुधवारी साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीत हजर राहिले. राठोड तीन आठवडे गायब होते. मात्र बैठकीत एकाही मंत्र्याने त्याबद्दल अवाक्षरही उच्चारले नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील भेटीत मात्र मुख्यमंत्र्यांनी राठोड यांची खरडपट्टी केल्याचे समजते.

बुधवारी राठोड इंडिगोच्या विमानाने मुंबईत आले. थेट सह्याद्री अतिथिगृह येथील मंत्रिमंडळ बैठकीला त्यांनी हजेरी लावली. राठोड येणार असल्याने माध्यम प्रतिनिधींनी गर्दी केली होती. मात्र राठोड माध्यमांशी काही बोलले नाहीत. कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राज्यपाल यांच्या अभिभाषणावर चर्चा आणि कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनांसंदर्भात एक सादरीकरण करण्यात आल्याचे समजते. सायंकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथिगृह येथील मंत्रिमंडळ बैठक संपल्यावर संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आदी वरिष्ठ मंत्री हजर होते. बैठकीत पूजा प्रकरणावर सुमारे तासभर खलबते झाली. त्यानंतर राठोड चर्चगेट येथील निवासस्थानी रवाना झाले.

शरद पवार नाराज नाहीत; मलिक यांचा दावा

मंत्रिमंडळ बैठकीला वनमंत्री संजय राठोड हजर होते. या बैठकीत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चर्चा झाली नाही, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर सांगितले. तसेच पोहरादेवी येथे राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याच्या बातम्या निराधार आहेत, असे मलिक यांनी स्पष्ट केले. गुरुवार, दि.२५ रोजी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. त्या बैठकीत कोणते निर्णय करायचे यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

भाजपचे हल्ले आणखी तीव्र; पोलिस महासंचालकांची भेट
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजपने हल्ले आणखी तीव्र केले अाहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बुधवारी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेतली. पूजा प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली. तर सुधीर मुनगंटीवार यांनी पूजा प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली.

बेजबाबदार संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्नचिन्ह
एकीकडे जनतेला गर्दी टाळण्याचे आवाहन करीत असताना राठोड यांनी पोहरादेवी येथे हजारो समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केल्याने मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यांची खरडपट्टी काढल्याचे समजते. मात्र, ते राठोड यांचा राजीनामा घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे समजते. राठोड हे उद्यापासून नेहमीप्रमाणे शासकीय कामकाजात भाग घेणार असल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...