आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा:कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो, मुख्यमंत्र्यांचे बाप्पाला साकडे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना संकटामुळे सामाजिक भान ठेवून शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे उद्धव ठाकरेंचे आवाहन

राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. घरोघरी बाप्पाचे स्वागत केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो असे साकडे देखील त्यांनी बाप्पाला घातले आहे. सोबतच कोरोना संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच काही सार्वजनिक गणेश मंडळांनी सामजिक प्रबोधन आणि आरोग्य शिबिर घेण्याचे नियोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, ''सण आणि उत्सवांची बदललेली रुपे आपण बघितलीत. यातील काळानुरुप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. कोरोनामुळे जिथे संपूर्ण जग हादरून गेले, तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करु आणि सामाजिक भान ठेवून शांततेत यंदाचा गणेशोत्सव साजरा करू'', असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

''दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण गणरायाची प्रतिष्ठापना करत आहोत. मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या संकटातून लवकर मुक्ती मिळावी, तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो, अशी प्रार्थना बाप्पाकडे केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. आतापर्यंत आपण जी काळजी घेत आहोत तीच पुढेही घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

''आता ही वेळ नियम पाळून उत्सव साजरा करण्याची आहे. श्रीगणेशाचे आगमन असो किंवा विसर्जन असो, प्रत्येकाने कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या घरात, गल्लीत आणि कॉलनीत होणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे'', असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काही सार्वजनिक गणेश मंडळांनी सामजिक प्रबोधन आणि आरोग्य शिबिर घेण्याचे नियोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, ''गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश हाती घ्यावा. तसेच मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास अधिक सोयीचे होईल.''