आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प शुभारंभ:चाळीतील कष्टकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य; चाळीतील संस्कृती, मराठीपण जपून ठेवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वसामान्यांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्काचे घर देण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले असून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

चाळीतील कष्टकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बीडीडी चाळींचा एक मोठा इतिहास आहे. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिलं. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु. ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णनच केलं आहे. अनेक क्रांतिकारी चळवळी तसेच आणि मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्या लोकांचे फार मोठे योगदान मुंबईच्या विकासात राहिले आहे .आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही.

चाळीतील संस्कृती, मराठीपण जपून ठेवा
संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचे वास्तव्य या मुंबईच्या चाळींमध्ये होते. या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका, अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.येथील ज्या जांबोरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्याना जन्माला घातले आहे, त्या ठिकाणीच आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

ग्रामीण भागात ५ लाख घरे
गेल्या काही महिन्यात सुमारे पाच लाख घरं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली, गिरणी कामगारांना देखील घर देण्यास सुरुवात केली असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच राहिले, मी त्यांच्याकडे लहानपणापासून जायचो, त्यामुळे चाळीतले जीवन मला माहिती आहे अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

ज्येष्ठ नेते,माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार म्हणाले, बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये होते. महाराष्ट्राच्या ऐक्याचे येथे दर्शन घडते. अनेक जाती- धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकसंधपणे येथे राहत आहेत.अशा या चाळींचा इतिहास आपण जतन केला पाहिजे. या चाळींमध्ये घरासोबतच लोकांना अन्य सुविधाही दिल्या पाहिजेत. चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका. तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका असेही पवार यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते “चाळींतले टॉवर” या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...