आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांना टोला:प्रश्न विचारणे सोपे असते कारण त्याला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिका नागरिकांना सर्वाधिक सुविधा देत असते. पण जरा कुठे खुट्टं झाले की लगेच महापालिकेला दुषणे दिली जातात. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. प्रश्नांचा भडिमार केला जातो. प्रश्न विचारा. प्रश्न विचारणे सोपे असते. त्याला अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज महापालिकेच्या ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

या वेळी कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोना काळात मुंबई महापालिकेचे उत्तमरित्या काम केले आहे. महापालिकेच्या कामाचे कुणी घरच्यांनी कौतुक केले नाही. तर थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो.कौतुक किती होईल याची मला चिंता नाही. दुषणं देणारे अनेक जण असतात. असे ठाकरे म्हणाले. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, आताच्या कार्यक्रमाची किती मोठी बातमी येईल हे माहीत नाही. उद्या कौतुक किती होईल त्याची अपेक्षा नाही. पण जरा कुठे खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडले जातात. नगरसेवक काय करतात? महापौर काय करतात? अशी दुषणे दिली जातात. आयुक्त काय करतात… हे काय करतात?… ते काय करतात..? हे सगळे ठिक आहे. पण तू काय करतो हे सांग? स्वत: काही करायचे नाही अन् प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणे सोपे असते, त्याला काही अकलेची गरज लागत नाही. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.

शहर स्वच्छ ठेवणे हे महापालिकेचे काम आहे. पण महापालिकेवरील ताण कमी करणे हे नागरिकांचे काम आहे. महापालिकेकडून जशी अपेक्षा आहे. तशीच पालिकेची नागरिकांकडूनही काही अपेक्षा आहे. महापालिका गटार सुद्धा साफ करते, पाणी पुरवठाही करते आणि स्वच्छताही राखते. महापालिकेचा कामगार मॅनहोलमध्ये जाऊन काम करत असतो याचंही भान नागरिकांनी ठेवले पाहिजे. आम्ही काम करतो म्हणजे उपकार करत नाही. पण काय काय काम करावे लागते हे जनतेला सांगणे गरजेचे आहे. तुमचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही काम करतो. या पालिकेचा तुम्हालाही अभिमान वाटला पाहिजे. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.