आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद:प्लाझमा दान करण्याचे कोरोनामुक्त रुग्णांना आवाहन, उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्त करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनलॉकच्या दिशेने वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आषाढी वारीला जाणार : ठाकरे
  • उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्त करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यात मंगळवार, ३० जूननंतर लाॅकडाऊन असेच राहणार असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. येत्या ३० जून रोजी लॉकडाऊन उठणार नाही, परिस्थिती आहे तशीही राहणार नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्यात टप्प्याटप्प्याने काही सवलती दिल्या जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

फेसबुक लाइव्हद्वारे रविवारी मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. कोरोनाची संख्या वाढत आहे. भाजी मंडईसह काही ठिकाणी होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. काही जिल्ह्यांमधून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार पुन्हा सुरू होणार या भ्रमात राहू नका. आजही ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत, पण म्हणून त्यांना प्रादुर्भाव झाला नाही असे नाही. त्यामुळे आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांकडून नुकसान भरपाईची वसुली
ग्रामीण भागातून बोगस बियाण्यांच्या तक्रारी येत आहेत. मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसूल केली जाईल, अशी तंबी ठाकरे यांनी दिली. आचारसंहिता आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देता आला नाही. ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून सर्व पात्र शेतकरी लवकरच कर्जमुक्त होतील,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

सद्यःस्थितीत राज्यातील जिल्हाबंदी उठवणार नाही : गृहमंत्री देशमुख
सांगली |
राज्यातील माेठ्या शहरांसह ग्रामीण भागातही काेराेनाचे रुग्ण वाढत अाहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत राज्यातील जिल्हाबंदी उठवण्यात येणार नाही, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. गृहमंत्री देशमुख रविवारी सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर हाेते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना ते म्हणाले, कोरोनामुळे पोलिस विविध कामात गुंतून पडले आहेत. ही कामे मार्गी लागताच अवैध जुगार अड्डे बंद करू. पतंजलीचे काेराेना अाैषध विक्रीसाठी अाणले तर ते जप्त केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जी औषधे सुचवली ती उपचारासाठी उपलब्ध
कोरोनावर जी जी औषधे यासाठी सुचवली जात आहेत ती उपलब्ध करून देत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. प्लाझमा थेरपीची सुरुवात महाराष्ट्रात एप्रिलपासून सुरू करण्यात आली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी, अँटिबॉडीज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझमा दान करण्याचे आवाहन उद्धव यांनी केले.

गणेशोत्सव काळात मिरवणूक काढता येणार नाही
सार्वजनिक दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मंडळांचे आभार मानून गणेशोत्सव काळातही आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही. कारण मोठ्या गणेशमूर्ती हलवताना जास्त माणसे लागू शकतात. ते आजच्या परिस्थितीत शक्य नाही. म्हणून ४ फूट उंचीपर्यंतची मूर्ती यंदा स्थापित करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी विठुरायाला साकडे घालणार
पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने महापूजेसाठी रीतसर निमंत्रण पाठवले होेते. परंतु राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यंदा आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महापूजेला जाणार किंवा कसे याबाबत संभ्रम होता. परंतु वारकऱ्यांचा, विठ्ठलभक्तांचा प्रतिनिधी म्हणून आपण आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाणार असून राज्य कोरोनामुक्त व्हावे यासाठी साकडे घालणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...