आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय जाहीर करताना औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ केला. विशेष म्हणजे त्यावर काँग्रेसचे औरंगाबादचे संपर्कमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा फोटो असल्याने नवाच वाद निर्माण झाला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ आक्षेप नोंदवून सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामकरणास काँग्रेसचा विरोध असल्याचे ठणकावले आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पेटला आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व कर्करोग रुग्णालयासाठी नव्या १६५ खाटा आणि ३५० पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली. हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या सोशल मीडियावर अकाउंटवर टाकण्यात आला. मात्र त्यात संभाजीनगर असे लिहून (औरंगाबाद) असे कंसात लिहिण्यात आले. विशेष म्हणजे त्या पोस्टवर काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांचा फोटो ठळकपणे वापरण्यात आला तसेच त्यावर मुख्यमंत्री ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही फोटो आहेत. महाराष्ट्राच्या जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने हे सोशल मीडिया अकाउंट हाताळण्यात येते. त्यामुळे या पोस्टवर उलटसुलट चर्चा सुरू झाली.
जनसंपर्क महासंचालनालयाने भान ठेवावे : थोरात
शिवसेनेच्या वतीने जनसंपर्क महासंचालनालयाने केलेल्या खोडसाळपणावर काँग्रेसचा मात्र तिळपापड झाला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ त्यावर संतप्त पोस्ट टाकली. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतराला आमचा ठाम विरोध आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतर करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतर करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, अशा शब्दांत थोरात यांनी ठणकावले. तसेच छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असा सल्लाही दिला.
चिकलठाणा विमानतळाच्या नामकरणाचे स्मरण
औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत लवकरात लवकर अधिसूचना काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांना स्मरणपत्राद्वारे कळवले आहे. याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असून अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहांत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे, असे पत्रात नमूद केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.