आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायद्याची बातमी:उपमुख्यमंत्र्यांनी व्हॅट कमी केल्याने राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त, मुंबईत सीएनजी 60 रुपये प्रति किलो, पीएनजी 36 रुपये प्रति एससीएम

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022 पासून 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे.

महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) 3 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे.नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी 60 रुपये प्रति किलो तर पीएनजी 36 रुपये प्रति एससीएम असेल.

मुंबई परिसरात सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त, पाईपद्वारे स्वयंपाक गॅस प्रति एससीएम 3.50 रुपये स्वस्त झाला आहे.

सामान्यांना दिलासा

एकीकडे पेट्रोल-डिझेलची भाववाढ सातत्याने होत असताना सामान्यजन होरपळत आहे. त्यातच राज्यसरकारने सीएनजी आणि पीएनजीवरील मुल्यवर्धित कर कमी केले. यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात झाली असून हा सर्वसामान्यांना एकप्रकारे दिलासा ठरणार आहे.

चारवेळा दरवाढीनंतर झाली कपात

ही कपात सलग चार वेळा दरवाढ झाल्यानंतर झाली आहे. महानगर गॅसने याआधी सहा महिन्यांत चार वेळा सीएनजी 11.43 रुपये प्रति किलो तर पीएनजी 6.68 रुपये प्रति एससीएमने महाग केला होता.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही केली होती घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. राज्य सरकारने आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली. तसेच, सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘सीएनजी’वरील व्हॅट 13.5 ऐवजी आता 3 टक्के झाल्याने सीएनजी-पीएनजी स्वस्त झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...