आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुलगुरूंची आज बैठक:महाविद्यालये लवकरच उघडली जाणार, राज्यपालांच्या पुढाकारानंतर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांना जाग

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील ५ वी ते ७ वी वर्गांच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता लवकरच महाविद्यालयेही सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. राज्यातील उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग भरवण्यास लवकरच परवानगी दिली जाणार आहे.

‘राज्यपाल महोदयांशी रविवारी सविस्तर चर्चा केली. सोमवारी सर्व कुलगुरूंची बैठक बोलावली आहे. त्यात महाविद्यालयांचे वर्ग भरवण्यासंदर्भात सविस्तर करण्यात येईल. त्यासंदर्भातला निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल,’ असे सामंत यांनी राजभवन येथील भेटीनंतर माध्यमांना सांगितले.

राज्यभरातून टीका
२७ जानेवारीपासून राज्यातील ५ ते ८ इयत्तेचे वर्ग भरवले गेले आहेत. ९ ते १२ इयत्तेचे वर्ग त्यापूर्वी भरवले जात आहेत. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सर्वांना खुली होत आहे. एसटी, बस, खासगी वाहतूक यांच्यावरील कोरोनाकाळातील टाळेबंदीचे निर्बंध हटवले गेले आहेत. तरी राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांतील वर्ग प्रत्यक्ष भरवण्याच्या हालचाली नव्हत्या. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात टीका सुरू झाली होती.

६२ एकूण शासकीय व खासगी विद्यापीठे
तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांची वादग्रस्त कार्यपद्धती : कोरोना लॉकडाऊन काळात सामंत यांनी पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षांचा मोठा घोळ घातला होता. विद्यापीठ अनुदान आयोग, राज्यपालांनी ताकीद देऊनही त्यांनी परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली होती. शेवटी न्यायालयास हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर ऑनलाइन -ऑफलाइन परीक्षा पार पडल्या होत्या.

कुलगुरूंनीच घेतला पुढाकार
शेवटी राज्यातील २० कुलगुरूंनी पुढाकार घेतला आणि राज्यपाल यांच्याबरोबर शुक्रवारी व्हिडिओ बैठक झाली. ‘महाविद्यालये उघडण्यासंदर्भात आमची तयारी आहे, मात्र राज्य सरकार निर्णयच घेत नाही. आपण कुलपती या नात्याने हस्तक्षेप करावा,’ असा आग्रह सर्व कुलगुरूंनी राज्यपालांकडे केला होता. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना जाग आली. आता पुढाकार न घेतल्यास राज्यपाल घेतील, अशी त्यांना भीती वाटली. त्यातून रविवारी सामंत घाईघाईत राज्यपालांच्या भेटीस गेल्याचे समजते.