आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईच्या पश्चिम उपनगरात म्हणजे दहिसरमध्ये महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान शनिवारी (४ फेब्रुवारी) गोंधळ झाला. जास्त उंचीच्या मुलींना बाहेर काढल्याचा आरोप महिला उमेदवारांनी करत आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलिसांशी आंदोलक महिला उमेदवारांची झटापट झाली, त्या वेळी केलेल्या लाठीचार्जमध्ये काही मुली जखमी आहेत.मुंबई महानगरपालिकेकडून अग्निशमन दलात ९१० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. १३ जानेवारीपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. भरती प्रक्रियेचे अर्ज स्वीकारण्याची आजची म्हणजे चार फेब्रुवारी रोजी शेवटची तारीख होती.
महिलांची उंची ही १६२ सेंमी असायला हवी असा निकष आहे. विविध जिल्ह्यांतून जवळपास ३ हजार मुली दहिसरमध्ये दाखल झाल्या होत्या. मात्र, १६३ किंवा १६४ सेंमी उंची असलेल्या उमेदवारांनाही बाहेर काढले जात असल्याचा आरोप या मुलींनी केला. भरउन्हात भरतीला आलेल्या मुलींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.आंदोलन करणाऱ्या मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गोंधळ वाढल्याने परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला. उंचीच्या निकषानुसार पात्र ठरलेल्या ३ हजार ३१८ उमेदवारांची पुढील निवड प्रक्रियेसाठी निवड केली.
उशिरामुळेे प्रवेश नाही आंदोलन करणाऱ्या महिला उशिरा आलेल्या होत्या. प्रत्यक्षात निवड प्रक्रियेची वेळ सकाळी ८ वाजताची होती. मात्र, अनेक मुली-महिला या निश्चित वेळे ऐवजी उशिराने सकाळी १० वाजता मैदानावर पोहोचल्या. त्यामुळे आम्ही उशिरा आलेल्या उमेदवारांना परवानगी नाकारली, असे मुंबई अग्निशमन दलाने स्पष्टीकरण दिले.
ठाकरे उमेदवारांसोबत अग्निशमन दलाने घालून दिलेल्या उंचीच्या नियमापेक्षा अधिक उंची असूनही आम्हाला डावलण्यात आले, असे या तरुणींनी सांगितले. या महिला उमेदवारांना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात आला. तसेच ही भरती प्रक्रिया रद्द केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारासुद्धा दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.