आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस रस्त्यावर:मंत्रालयाशेजारच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचे योगी सरकारविरुद्ध आंदोलन; राहुल, प्रियंकांना धक्काबुक्कीचे राज्यात पडसाद; सुळे, संजय राऊतांकडून निषेध

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन - Divya Marathi
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की व अटक केल्याचे पडसाद शुक्रवारी राज्यात उमटले. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मंत्रालयाशेजारच्या गांधी पुतळ्यासमाेर आंदोलन केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आ. झिशान सिद्दिकी, माजी मंत्री अनिस अहमद, बाबा सिद्दिकी, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, सचिन सावंत, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकार व योगी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, उत्तर प्रदेशात जंगलराज आहे हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. हाथरस येथील अमानवी घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार करत आहे. त्यामुळेच राहुल आणि प्रियंका गांधी यांना हाथरस येथे जाऊ दिले गेले नाही.

मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री योगी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रीय नेत्यांबरोबर उत्तर प्रदेश पोलिसांची वर्तणूक अत्यंत चुकीची असल्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख म्हणाले. उत्तर प्रदेशचे पाेलिस राजकीय हेतूने प्रभावित झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

सांगली-मिरज रस्त्यावर युवक काँग्रेसचे आंदोलन
सांगल| राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ गुरुवारी सांगली- मिरज रस्त्यावर युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. शांततेच्या मार्गाने राहुल गांधी पीडितांना भेटणार होते, परंतु त्यांना रोखण्यासाठी बळजबरी करण्यात आली. देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी जे वर्तन पोलिसांनी केले आहे त्याच्या निषेधार्थ गुरुवारी दुपारी ३ वाजता काँग्रेस कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी दोन तास वाहतूक रोखून धरण्यात आली.

नेत्यांनी केला निषेध
‘उत्तर प्रदेशातून कोणी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असेल तर इथून आम्ही यावर टिप्पणी करणे योग्य नाही. पण, योगींचा राजीनामा मायावतींनी मागून उपयोग नाही, आठवले यांनी मागितला पाहिजे .’ - संजय राऊत, शिवसेना

‘राहुल गांधी हे खासदार आहेत ते कुठेही जाऊ शकतात. राहुल यांना सरकारने केलेली धक्काबुक्की धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी केली पाहिजे. लोकप्रतिनिधीची कॉलर धरणे योग्य आहे का? - सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी

अत्याचारपीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हाथरसकडे निघालेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखणे, धक्काबुक्की करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. - अशोक चव्हाण, काँग्रेस

बातम्या आणखी आहेत...