आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस कार्यकर्त्यांनो 'जय बळीराजा' म्हणा!:प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन; सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची आठवण व्हावी, ही अपेक्षा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना 'जय बळीराजा' म्हणावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. तसेच, 'वंदे मातरम्'ला आपला विरोध नाही. राष्ट्रगीतासोबतच 'वंदे मातरम्' हे गीत देशाचा स्वाभिमान आहे. मात्र, त्याचा प्रचार करण्याची आवश्यकता नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी 'वंदे मातरम्' म्हणावे, असा आदेश दिला आहे. यावर विरोधकांकडून टीका होत असतानाच काँग्रेसने आता 'जय बळीराजा' म्हणण्याचा आग्रह केला आहे.

बळीराजा जगाचा पोशिंदा

नाना पटोले यांनी सांगितले की, राष्ट्रगीत, वंदे मातरम् आमचा स्वाभिमान आहे. मात्र, बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. म्हणून यापुढे राज्यातील काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांनी आपापसात भेटताना व जनतेशी संवाद साधताना 'जय बळीराजा' म्हणावे. यानिमित्ताने देश तसेच राज्यातील सत्ताधीशांना बळीराजाची आठवण व्हावी, अशी अपेक्षा आहे.

प्रचाराची आवश्यकता नाही

नाना पटोले म्हणाले, राष्ट्रगीत व वंदे मातरम् हा आपला स्वाभीमान आहे. या स्वाभीमानाचा सन्मान ठेवलाच पाहिजे. त्यांना आदर्श मानूनच नागरिकांनी वाटचाल करणे अपेक्षित आहे. नागरिक या गीतांचा सन्मान ठेवताही. मात्र, त्याचा प्रचार करण्याची आवश्यकता नाही. वंदे मातरम् म्हणण्यासही आपला विरोध नाही.

दुसरा शब्द द्या- रझा अकादमी

दरम्यान, मुनगंटीवार यांच्या आदेशाला रझा अकादमीने विरोध केला आहे. 'वंदे मातरम्' ऐवजी दुसरा शब्द देण्याची मागणी अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी केली आहे. याबाबत मौलाना आणि संबंधितांशी चर्चा करून राज्य सरकारला पत्र लिहिणार असल्याचे नूरी यांनी सांगितले आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका. कोणी काय खावे, काय घालावे, काय बोलावे हे तुम्ही ठरवणार का? असा सवाल आव्हाडांनी मुनगंटीवार यांना केला आहे.

बातम्या आणखी आहेत...