आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल सत्य:आघाडीत ‘नाना कळा’; नाना पटोले यांचा वादग्रस्त व्हिडिओे, उपमुख्यमंत्र्यांची नाराजी; पटोलेंच्या आक्रमकतेवर राहुल गांधी खुश

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पटोलेंच्या वक्तव्याने शिवसेना-राष्ट्रवादीला कापरे भरले : फडणवीस

मी कधी, कुठे सभा-बैठका घेतो यावर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. काँग्रेस पक्ष लोकांचा पक्ष बनत असून शिवसेना-राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, असे धक्कादायक वक्तव्य असलेली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ध्वनिचित्रफीत सोमवारी व्हायरल झाली. नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत विसंवादाच्या कळा असल्याचे स्पष्ट झाले. पटोलेंच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सोमवारी पटोलेंचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला’ असे सांगून पटोलेंनी घूमजाव केले. दरम्यान, आघाडीत कुठलाही विसंवाद नसल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी म्हटले आहे. लोणावळा येथे शुक्रवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात त्यांनी जे भाषण केले त्याचा काही भाग सोमवारी समोर आला. त्यात पटोले यांनी काँग्रेस पक्ष सहभागी असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या वक्तव्यामुळे आघाडीत नवा वाद उद्भवला आहे.

....नंतर घूमजाव
पटोले यांनी आपल्या वक्तव्याबाबत नागपुरात दुपारी खुलासा केला. मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केलेले नाहीत. निधी वाटप समान होत नसल्याने आघाडीत असंतोष आहे. याची कल्पना आपण मुख्यमंत्र्यांना दिली होती. अजित पवार यांना भेटून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करेन.हा भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे.

पटोलेंच्या वक्तव्याने शिवसेना-राष्ट्रवादीला कापरे भरले : फडणवीस
नागपूर | पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांना कापरे भरले आहे. त्यांना जेवण जात नाही आणि पाणीही पिता येत नाही. ते अत्यंत घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पाळत ठेवली असावी असे नानांच्या वक्तव्यातून आम्हाला वाटते, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मात्र पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पाळत ठेवावी का वाटते हे तेच सांगू शकतात, असे फडणवीस म्हणाले. आघाडीत अविश्वासाचे वातावरण आहे, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

पटोलेंच्या आक्रमकतेवर राहुल गांधी खुश
काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे सोमवारी मुंबईत होते. पत्रकार परिषदेत खरगे यांना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारले असता, मी पटोले यांच्यावर काहीही बोलणार नाही, असे म्हणत खरगे यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र नाना पटोले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात काँग्रेस जिवंत असल्याचे जाणवते आहे. पटोले यांच्या रूपाने काँग्रेसला राज्यात लढाऊ नेतृत्व लाभले आहे, असे राहुल गांधी यांना वाटते आहे. त्यामुळे पटोले यांना थोडीशी आवर घालतानाच त्यांना त्यांच्या पद्धतीने पक्ष संघटनेचे काम करू द्यावे, अशी सूचना मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्य प्रभारी एच. के. पाटील यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुरक्षा पुरवणे म्हणजे पाळत ठेवणे नाही : राष्ट्रवादी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. सुरक्षा पुरवणे म्हणजे पाळत ठेवणे नाही, सुरक्षा नको असेल तर बंद केली जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...