आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे, फडणवीसांनाच गुजरातला पाठवा:काँग्रेसची थेट राज्यपालांकडे मागणी; दोघेही महाराष्ट्राचे नव्हे मोदी-शहांचेच हस्तक- नाना पटोले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला जात असताना आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गुजरातला पाठवा, अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांचीच कबुली

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी काही नेत्यांसह राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हस्तक आहेत. औरंगाबाद येथील सभेत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कबुली दिली आहे की, ते मोद व शहांचे हस्तक आहेत. हे दोन्ही नेते महाराष्ट्राचे हस्तक नाही.

नाना पटोले म्हणाले की, केवळ मोदी-शहांचे हस्तक असलेल्या शिंदे-फडणवीसांनाही आता गुजरातला पाठवा, अशी भूमिका आम्ही राज्यपालांसमोर मांडली आहे. राज्यपालांनी मात्र यावर काय प्रत्युत्तर दिले, हे नाना पटोलेंनी सांगितले नाही.

जनतेपासून काही लपत नाही

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मविआ काळात 23 कंपन्यांनी केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली आहे. यावरही नाना पटोलेंनी टीकास्त्र सोडले. नाना पटोले म्हणाले की, उद्योगमंत्र्यांना काळी पत्रिका काढायची आहे की निळी पत्रिका हे त्यांनीच ठरवावे. सत्य काय आहे, हे सर्वांना माहित आहे. जनतेपासून काही लपत नाही.

ईडीचा गैरवापर करत सरकार स्थापले

केंद्रीय तपास यंत्रणांवरुनही नाना पटोलेंनी भाजप व शिंदे सरकारवर टीका केली. नाना पटोले म्हणाले की, राज्यात सध्या ईडीचे सरकार आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभाग अशा यंत्रणांचा गैरवापर करुनच हे सरकार बेकायदेशीरपणे स्थापण्यात आले आहे. तपास यंत्रणांच्या गैरवापरावरच राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचे अस्तित्व अवलंबून आहे.

मोदींची नौटंकी

गुजरातमधील मोरबी पुल दुर्घटनेवरुन पटोलेंनी मोदींवरही टीका केली. नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान मोदी यांना जनतेच्या जीवाशी काहीही देणेघेणे नाही. एवढ्या भीषण दुर्घटनेनंतरही ते तिथे जाऊन भाषण देत आहे. नौटंकी करत आहे. केवळ गुजरातच नव्हे तर देशातील प्रत्येक भाजपशासित प्रदेशात जनतेचा खेळखंडोबा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...