आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय शिमगा:ओबीसी आरक्षणावरून काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपचे एकमेकांवर खापर, आरक्षण संपवण्याचा घाट : भुजबळ

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने वारंवार राज्य सरकारला फटकारल्यानंतर आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची राजकीय धुळवड सुरू झाली आहे. आरक्षण मिळेपर्यंत भाजप २७ टक्के ओबीसी उमेदवारांना तिकिटे देईल, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. फडणवीसांच्या घोषणनंतर तत्काळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे हे प्रेम पुतना मावशीचे असल्याचे सांगून आरक्षण घालवण्यास फडणवीसच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी शनिवारी भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाची बैठक झाली. या वेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. महाविकास आघाडी सरकार विश्वासघाताचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. आघाडी सरकारच्या मनातच कायदा टिकवण्याचा हेतू नाही, यामुळे ते कायदा टिकवू शकले नाही. यामुळे आता कोर्टाने निवडणुका घेण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजप व फडणवीस सरकारच : नाना पटोले
मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. भाजपचा डीएनए ओबीसीविरोधी आहे आणि आता आरक्षणाबद्दल भाजप दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा प्रहार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पटोले म्हणाले, मंडल आयोग लागू केल्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाला २७ टक्के आरक्षण लागू झाले. या निर्णयाला देशभर भारतीय जनता पक्षानेच तीव्र विरोध केला होता हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी आधी आपला इतिहास तपासून पाहावा. ओबीसींच्या आरक्षणाचा मारेकरी भाजप असून त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडून भाजप आपल्या पापातून मुक्त होऊ शकत नाही, असे पटोले म्हणाले.

आरक्षण संपवण्याचा घाट : भुजबळ
नाशिक | काही लोकांकडून शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार बाजूला सारत, आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा गंभीर आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. उज्ज्वला गॅस, पंतप्रधान आवास योजनेसाठी तोच इम्पिरिकल डेटा वापरला जात आहे. मात्र राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी इम्पिरिकल डेटामध्ये त्रुटी दाखवली जाते. भाजपशासित राज्यांना मदत करताना इतरांना ती केली जात नाही,असे ते म्हणाले.

आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात निवडणुका होणार हे संकट
ओबीसी आरक्षणाशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका होणार हे संकट आहे. यानंतर एखाद्याने याचिका दाखल करून पाच वर्षे आरक्षण न मिळाल्याने आता त्याची गरज नाही, अशी भूमिका घेतल्यास ओबीसी आरक्षण आपण कायमचे गमावून बसू. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा आमचा लढा आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवणार आहोत. आरक्षण मिळेपर्यंत त्या-त्या निवडणुकांमध्ये २७% तिकिटे ओबीसींनाच देणार असल्याचा भाजपचा निर्धार आहे. भाजप हा ओबीसींचा पक्ष आहे. ओबीसींच्या भरवशावर मोठा झालेला पक्ष आहे.’

बातम्या आणखी आहेत...